नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ११७व्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत शाहू स्मारक भवन येथे छायाचित्र व माहिती प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहिती व्हाईट आर्मीचे संस्थापक अध्यक्ष अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.
    या वेळी ते म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीचे जेवढे श्रेय लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, अशा महान नेत्यांनी केलेल्या जनजागृतीकडे जाते, तेवढेच श्रेय सुभाषचंद्रांच्या या धाडसी पराक्रमाकडे जाते. थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या झंझावाती व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारी छायाचित्रे व माहितीचे प्रदर्शन व्हाईट आर्मीतर्फे भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन २३ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता सुभाषचंद्र बोस यांच्या लढय़ाचे साक्षीदार असणाऱ्या डॅनियल काळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
    पुण्यातील आझाद हिंद मंडळाने केलेल्या सहकार्यामुळे अगदी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्मापासून ते शालेय जीवनातील क्षण ते जर्मन देशाचे सरसेनापती हिटलरांच्या भेटीचे छायाचित्र, बोस यांच्याविषयी असलेली माहिती, छायाचित्रे प्रदर्शनात लावण्यात येतील. त्यांच्या महान कार्याची माहिती युवकांसहित सर्वाना होऊन राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम वाढीस लागावे यासाठी याचे आयोजन केले आहे. याच वेळी स्लाईड शो, माहितीपटही दाखवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे याचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी या वेळी केली. पत्रकार परिषदेला चंद्रकांत परुळेकर, उमेश जाधव, सुनील कांबळे, प्रशांत शेडे, कृष्णात सोरटे, अनिल पाटील आदी उपस्थित होते.