गेल्या पंधरवडय़ातील वाढत्या तापमानामुळे नागपूर विभागातील मध्यम व लघु प्रकल्पांच्या जलस्तरात मोठी घट झाली आहे. विभागातील तीन मोठे व तीन मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. ४० मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ १४ टक्के तर ३१० लघु प्रकल्पांमध्ये १५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पावसाळा सुरू होण्यास अजून तीन आठवडय़ांचा अवधी असल्याने पाणी जपून वापरावे लागणार आहे.
या विभागातील मोठय़ा प्रकल्पांची स्थितीही फारशी चांगली नाही. गोसीखुर्द टप्पा १, लोअर वर्धा टप्पा १ व कामठी खैरी हे तीन प्रकल्प वगळता इतर १३ प्रकल्पांमधील जलस्तर ३० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. प्रकल्पांतील पाण्याचा काटकसरीने वापर न केल्यास दोन आठवडय़ानंतर विभागात भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
गोंदिया जिल्ह्य़ातील कालीसरार, नागपूर जिल्ह्य़ातील नांद वणा व गडडचिरोली जिल्ह्य़ातील दिना प्रकल्प कोरडे पडले आहेत.
इतरही सिंचन प्रकल्प आटण्याच्या मार्गावर असून नागपूर विभागातील मोठय़ा प्रकल्पात तोतलाडोह ४० टक्के, कामठी खैरी ६३ टक्के, रामटेक २४ टक्के, वडगाव २३ टक्के, इटियाडोह ८ टक्के, सिरपूर १२ टक्के, पुजारी टोला १४ टक्के, असोलामेंढा २१ टक्के, बोर ११ टक्के, धाम १७ टक्के, पोथरा ११ टक्के,  लोअर वर्धा पहिला टप्पा ४२ टक्के, गोसीखुर्द पहिला टप्पा ६५ टक्के धरणसाठा उपलब्ध आहे. विभागातील मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त १४ आणि लघु प्रकल्पांमध्ये १५ टक्के पाणी शिल्लक आहे. उन्हाळ्याच्या पाश्र्वभूमीवर पाण्याची मागणी आणि धरण साठय़ांचा घटता जलस्तर यामुळे मे महिन्याचा दुसरा पंधरवडा आणि जूनमध्ये जलसंकट ओढवण्याची शक्यता आहे. या प्रकल्पांमधून बाष्पीभवनामुळे पाणी कमी होण्याचे प्रमाण आता वाढले आहे.
सिंचनासाठी काही प्रकल्पांमधून पाणी वापरले जात असताना जलस्तर घट अपरिहार्य आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण ठेवले गेल्याने काही प्रकल्पांना धोका नाही. मात्र, काही धरणांमध्ये केवळ मृतसाठा शिल्लक उरला असल्याने जलसंकटांची तीव्रता वाढली आहे.