एका दहा वर्षांच्या मुलीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना विक्रोळीत उघडकीस आली आहे. पार्क साईड पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. यातील एक आरोपी पीडित मुलीचा नातेवाईक असून अन्य दोघे तिचे शेजारी आहेत. मागील काही महिन्यांपासून ते या मुलीवर लैंगिक अत्याचार करत होते. त्यांनी धमकी दिल्याने घाबरून तिने हा प्रकार कुणाला सांगितला नव्हता. परंतु बुधवारी तिला त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे हा प्रकार उघडकीस आला. वडाळा येथेही एका दहा वर्षांच्या मुलावर दोन अल्पवयीन तरुणांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी या दोन्ही मुलांना अटक केली आहे.
पित्याकडून मुलीवर अत्याचार
स्वत:च्याच ८ वर्षीय मुलीवर पित्याने बलात्कार केल्याची घटना अंधेरीत उघडकीस आली आहे. या मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून डीएन नगर पोलिसांनी या पित्याला अटक केली आहे. पीडित मुलगी आई-वडिलांसह अंधेरीत राहते. आरोपी पिता हा व्यवसायाने पेंटर आहे. मंगळवारी मध्यरात्री मुलीच्या आईला जाग आली असताना तिचा पती मुलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे दिसले. तिने त्वरित नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. डीएन नगर पोलिसांनी या पित्याला बाललैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत अटक केली असून त्याला १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. वैद्यकीय चाचणीत मुलीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या वर्षीसुद्धा पीडित मुलीच्या आईने त्याला मुलीशी लैंगिक चाळे करताना पकडले होते. त्यावेळी त्या दोघांमध्ये वाद झाला होता. पण बदनामीपोटी ती गप्प बसली होती.
खंडणीखोर पत्रकारास अटक
शिधावाटप दुकानदाराकडून तीन लाखांची खंडणी उकळणाऱ्या एका स्थानिक साप्ताहिकाच्या दोन पत्रकारांना गुन्हे शाखा ७ च्या पथकाने अटक केली आहे. फिर्यादी यांचे मुलुंड येथे शिधावाटप केंद्र आहे. ते बंद झाल्याने त्यांनी आपल्या दुकानातील ग्राहक मुलाच्या शिधावाटप दुकानात वळवले होते. अशा प्रकारे हे बेकायदेशीरपणे शिधावाटप केंद्र चालवले जात असून त्याविषयी तक्रार न करण्यासाठी स्थानिक साप्ताहिक ‘युवा प्रभाव’च्या पत्रकाराने फिर्यादीकडे तीन लाख रुपयांची खंडणी मागितली होती. फिर्यादीने घाबरून संपादक आणि पत्रकारास २५ हजार रुपये दिले होते. मात्र त्यानंतरही हे पत्रकार फिर्यादीला खंडणीसाठी धमकावत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील यांच्या पथकाने सापळा लावून पत्रकारांना अटक केली. त्यांनी परिसरातील व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळली असण्याची शक्यता पाटील यांनी व्यक्त केली आहे.