आरोपीच्या कबुलीजबाबाचे पोलिसांनी केलेले व्हिडिओ चित्रीकरण अविश्वसनीय मानून, भावाचा खून केल्याच्या आरोपातून तीन आरोपींची सत्र न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे.
गजानन टेकाडे (४५, रा. लोहगड, काटोल) आणि जानराव टेकाडे (६०) व त्याचा मुलगा देवेंद्र (३०), दोघेही रा. बुटीबोरी अशी आरोपींची नावे असून भुजंगराव टेकाडे (५०, रा. लोहगड) याचा खून केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
सरकार पक्षाच्या म्हणण्यानुसार, काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोहगड येथे राहणारे भुजंग टेकाडे व गजानन टेकाडे यांच्यात वैर होते. भुजंगने आपल्या जनावराला विषप्रयोग करून मारले, तसेच तो आपल्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहतो असा गजाननला संशय होता. यावरून त्यांची भांडणे होऊन दोघांनी एकमेकांचा जीव घेण्याची धमकी दिली होती.
१४ ऑक्टोबर २०११ रोजी मध्यरात्री भुजंगराव शेतात पंप सुरू करायला गेला असताना गजानने पहारीने त्याचा खून केला आणि प्रेत सोयाबीनच्या ढिगात ठेवून गंजी पेटवून दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे अर्धवट जळालेले प्रेत गंजीत सापडले. भुजंगचा भाऊ कृष्णा याने काटोल पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीत जानराव व देवेंद्र यांच्यावर संशय व्यक्त केला, परंतु नंतर हे दोघे बुटीबोरीला होते असे सांगितले. पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास केला. गजाननला संशयाच्या आधारे अटक करण्यात येऊन त्याची सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा मंजूर केला. त्याने घटनास्थळासह गुन्ह्य़ात वापरलेली पहार व कपडे काढून दिले. पोलिसांनी त्याच्या कबुलीजबाबाचे व्हिडिओ चित्रीकरण करून ते न्यायालयात सादर केले. न्यायालयात सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. पोलिसांनी सादर केलेला पुरावा कच्चा व संशयास्पद असल्याचा बचाव पक्षाचा युक्तिवाद होता. आरोपीच्या जबाबाचे व्हिडिओ चित्रीकरण करणे कायद्याला मान्य नाही. त्याच्यावर दबाव टाकूनही असे चित्रीकरण करता येऊ शकते. त्यामुळे या चित्रीकरणावर विश्वास ठेवू नये, असे बचाव पक्षाचे म्हणणे होते. शिवाय दोन आरोपींवर संशय व्यक्त करण्यात आला असताना तपासानंतर तिसऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल केल्यामुळे सरकार पक्षाची केस कमकुवत आहे, हे त्यांचे म्हणणे मान्य करून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.पी. डोरले यांनी तिन्ही आरोपींची  निर्दोष सुटका केली. आरोपींची बाजू अ‍ॅड. चंद्रशेखर जलतारे व दीपक दीक्षित यांनी, तर सरकार पक्षाची बाजू सहायक सरकारी वकील आय.एच. काझी यांनी मांडली.