शहरातील हनुमानवाडी परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील तीन संशयितांना पंचवटी पोलिसांनी जेरबंद केले. यावेळी दोघे फरार झाले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील काही दिवसात शहरात चोरी, घरफोडीचे प्रकार वाढले असताना गुन्हेगारी घटनांमध्येही वाढ झाली आहे. या पाश्र्वभूमीवर, पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेऊन रात्रीची गस्तही वाढविली आहे. शुक्रवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास पंचवटी पोलिसांचे गस्तीपथक हनुमानवाडी, चौधरी मळा, प्रोफेसर कॉलनी परिसरात गस्त घालत होते. यावेळी अनमोल अपार्टमेंटजवळ पाच तरूणांचे टोळके संशयास्पद हालचाली करत असताना आढळून आले. पोलिसांनी सापळा रचून टोळक्याला घेरले. त्यांच्याजवळील सामानाची झाडाझडती घेत असताना दोघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. टोळीतील धीरज रतन पाटील, शंकर संजय शिंदे व अश्विन सखाराम भावसार यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून लोखंडी सूरा, कोयता, नॉयलॉनची दोरी आदी साहित्य जप्त करण्यात आले. भरत पवार व मुस्तफा सय्यद अशी फरार झालेल्या संशयितांची नांवे आहेत. तपासात अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर, वाढलेले चोरी व घरफोडीचे प्रकार नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणा सतर्क झाली आहे.