तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींच्या होऊ घातलेल्या ९६७ जागांच्या निवडणुकांसाठी जवळपास पावणे तीन हजार उमेदवार रिंगणात असून शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक व त्यांच्या समर्थकांनी एकच गर्दी केल्याने प्रशासनाची धांदल उडाली. या दरम्यान उमेदवारी दाखल करण्याची व्यवस्था केलेल्या शिवाजी जिमखान्यात पोलिसांनी बंदोबस्ताच्या नावावर अतिरेक केल्याची तक्रार अनेक उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी केली आहे.
उमेदवारी अर्जासोबत विविध प्रकारची प्रतिज्ञापत्रे सादर करणे आवश्यक असते. ही प्रतिज्ञापत्रे करण्यासाठी १०० रुपयांचे मुद्रांक येथे उपलब्ध होत नसल्याने उमेदवारांची मोठी दमछाक झाली. नंतर मुद्रांकाची सक्ती शिथिल करून साध्या कागदावर प्रतिज्ञापत्र देण्याची मुभा महसूल प्रशासनाने दिल्याने उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मात्र आरक्षित जागेवरील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र वा जात पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर करण्याचा पुरावा सादर करणे बंधनकारक असल्यामुळे आरक्षित जागेवरील उमेदवार व त्यांच्या समर्थकांचा बराच वेळ गेला. शिवाय गटा-तटाचे राजकारण या कारणांमुळे उमेदवारी दाखल करण्यासाठी बहुसंख्य उमेदवारांना बुधवारचा शेवटच्या दिवसाचा मुहूर्त सापडला. त्यामुळे शिवाजी जिमखाना परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
छाननी वेळीदेखील मोठी गर्दी उसळली. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक व समर्थकांना बराच वेळ ताटकळत बसावे लागले. या दोन्ही दिवशी गर्दीचे नियंत्रण करतांना पोलीस प्रशासनाची धांदल उडाल्याचे चित्र दिसून आले. शिवाजी जिमखान्यात पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे दिवसभर ताटकळत बसलेले उमेदवार व त्यांच्या समर्थकांना पाणी पिण्यासाठी बाहेर पडावे लागत होते. मात्र एकदा बाहेर पडलेल्यांना पुन्हा आत प्रवेश न देण्याची ताठर भूमिका दुपारनंतर पोलीस घेत होते. त्यातून उभयपक्षी खटके उडत असल्याचे दिसून आले. पाणी पिण्यासाठी बाहेर जाणाऱ्यांना पुन्हा प्रवेश नाकारण्याच्या पोलिसांच्या भूमिकेमुळे अनेकांनी नापसंती व्यक्त करत हा अतिरेक असल्याचा सूर लावला. यावेळच्या निवडणुकीत तरुणांचा मोठय़ा प्रमाणावर सहभाग दिसून येत असून अनेक ठिकाणी दुरंगी व तिरंगी लढती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचेळी चोंढी, मथुरपाडे, नागझरी निमगाव खुर्द मेहुणे या पाच गावांमध्ये जितक्या जागा तितकेच उमेदवार असल्याने तेथील निवडणुका अविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.