वरिष्ठ निरीक्षकांचे बौद्धिक..
मुंबईवर दहशतवादी हल्ला होऊ नये यासाठी अतिवरिष्ठ अधिकारी अधिकच सक्रिय झाल्याचे आढळून येत आहे. या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुपीक डोक्यातून आलेल्या कल्पनेनुसार आता प्रत्येक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांचे बौद्धिक घेतले जात आहे. या बौद्धिक वर्गासाठी वरिष्ठ निरीक्षकाने सकाळी ९ पासून सायंकाळी ६पर्यंत हजर राहावे, असे आदेश जारी करण्यात आले आहेत. वास्तविक अशा प्रकारच्या बौद्धिकामध्ये प्रत्यक्ष कृतीपेक्षा कागदी घोडेच नाचविले जात आहेत, याकडेही काही वरिष्ठ निरीक्षकांनी लक्ष वेधले आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सावध झालेल्या पोलिसांनी आपापल्या परीने दहशतवादाला तोंड देण्याची तयारी सुरू केली. आजही पोलीस ठाण्यात बुलेटप्रुफ जॅकेटची वानवा असली तरीही आत्मविश्वासाच्या जोरावर पोलीस दल सामोरे जाण्याची तयारी करीत आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून पोलीस ठाण्यात स्वतंत्र दहशतवादविरोधी कक्ष स्थापन केल्यानंतर मात्र पोलीस दलात अस्वस्थता वाढू लागली आहे. याचे कारण म्हणजे हा कथित कक्ष ‘टाइम-पास’ सेल म्हणून ओळखला जाऊ लागला असून त्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे आढळून आले आहे.
दहशतवादाच्या छायेखाली असलेल्या मुंबापुरीत दहशतवादविरोधी विभागाचे मुख्यालय आहे. मुंबईसाठी स्वतंत्र युनिट कार्यालये आहेत. अशावेळी पोलीस ठाण्याच्या पातळीवर समांतर कक्ष उभारण्याची गरज नव्हती. परंतु स्वतंत्र कक्ष उभारल्यामुळे आता या कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवरच फक्त दहशतवादविरोधी कारवायांची माहिती गोळा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याचा समज झाला आहे. त्यामुळे अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी ती आपली जबाबदारी नसल्याचे सांगू लागले आहेत. या कक्षातील अधिकारी-कर्मचारी थोडय़ा वेळापुरते पोलीस ठाण्यात येतात आणि दहशतवादी कारवायांची माहिती मिळविण्यासाठी जातो, असे सांगून बाहेर पडतात ते थेट संध्याकाळी परततात. त्यांनी नेमकी काय माहिती गोळा केली हेही त्यांना नीट सांगता येत नाही. या कक्षातील अधिकाऱ्यांवर थेट वरिष्ठांचे नियंत्रण असल्याचे सांगितले जाते. एकीकडे दहशतवादविरोधी विभाग कार्यरत असताना असा स्वतंत्र कक्ष हवा का, असा सवाल वरिष्ठ निरीक्षक विचारीत आहेत. वरिष्ठ निरीक्षकांनी या कक्षावर नियंत्रण ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. परंतु अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश पुढे करीत हे अधिकारी-कर्मचारी अक्षरश: टाइमपास करीत असल्याचे दिसून येत आहे.पोलीस ठाण्याच्या पातळीवर वरिष्ठ निरीक्षकांना अनेक जबाबदाऱ्या असतात. प्रत्येक दिवशी दहशतवादविरोधी कक्ष नेमके काय काम करतो, यावर लक्ष ठेवणे शक्य नाही. वरिष्ठ निरीक्षकांच्या मानाने कमी व्यस्त असलेल्या सहायक आयुक्तांकडे या कक्षाची जबाबदारी सोपवावी. त्यामुळे या कक्षातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहील. या कक्षातील सर्वच अधिकारी वा कर्मचाऱ्यांना दहशतवादविरोधी कारवायांची माहिती मिळविण्याचे विशेष प्रशिक्षण दिलेले नाही. मग अशावेळी काही ठरावीक अधिकारी-कर्मचारीच तेथे राहणे योग्य आहे का, असा सवालही केला जात आहे.