महापालिका प्रशासनाने अंदाजित केलेल्या पुढील वर्षीच्या उत्पन्नात स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात जी वाढ दर्शविण्यात आली आहे, तेवढे उत्पन्न मिळवणे कठीण जाईल, असे आयुक्त महेश पाठक यांनी स्पष्ट केल्यामुळे यावर्षीप्रमाणेच पुढच्या वर्षीही विकासकामांच्या तरतुदींमध्ये कपात होणार असल्याचे दिसत आहे.
स्थायी समितीने सादर केलेले अंदाजपत्रक तब्बल ५६२ कोटी ५० लाख रुपयांनी फुगवण्यात आले असून जी जकात रद्द होणार आहे त्या जकातीपोटी समितीने १,६५७ कोटी  रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे.
हे उत्पन्न प्रशासनाने १,४०७ कोटी रुपये एवढे धरले होते. या शिवाय अशाचप्रकारे इतर उत्पन्नाचेही आकडे वाढवण्यात आले आहेत. याबाबत पत्रकार परिषदेत विचारले
असता आयुक्त म्हणाले की, जकात आणि इतर गोष्टींमध्ये धरलेले हे उत्पन्न मिळवणे कठीण जाईल.
जकात १ एप्रिलपासून रद्द झाल्यास स्थानिक संस्था कर (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) लागू होईल. त्याची तयारी प्रशासनाने केली असून सुरुवातीला अपेक्षित उत्पन्न
मिळवणे थोडे कठीण जाते. मात्र, नंतर एलबीटीमधूनही चांगले उत्पन्न मिळते. त्यासाठी कर्मचारी वर्ग, कार्यालय आणि इतर तयारी झाली आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार
आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.