सरकारने जिल्हा परिषदांच्या हाती प्राथमिक शिक्षणासारखे हत्यार दिले आहे आणि शिक्षण हे समाज परिवर्तनाचे हत्यार आहे. शिक्षण म्हणजे केवळ शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न असे न समजता, शाळा हे संस्कार केंद्रे बनवण्याची जबाबदारी जि. प. सदस्य व पदाधिकाऱ्यांनी स्वीकारावी त्याच बरोबर दुष्काळ गंभीरपणे घेऊन दुष्काळग्रस्तांचे आश्रू पुसण्याचे काम संवेदनशील बनून करावे, असा सल्ला माजी जि. प. अध्यक्ष व माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी दिला.
गडाख लिखित ‘अंतर्वेध’ पुस्तकास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा (पुणे) व प्रतिष्ठेचा दमानी साहित्य (सोलापुर) पुरस्कार मिळाल्याबद्दल जि. प.च्या वतीने त्यांचा ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे होते.
ज्या संस्थेत आपण काम करतो त्या संस्थेची मान ताठ राहील, अशी जनभावना निर्माण करण्याची जबाबदारीही सदस्य व पदाधिकाऱ्यांवर आहे, याची जाणीव गडाख यांनी यावेळी करुन दिली. ते म्हणाले आपल्या पुस्तकांना मिळालेले पुरस्कार माझे वैयक्तिक नाहीत, पंचायत राज व्यवस्थेत मी जे इतरांबरोबर २० वर्षे कार्यकर्ता म्हणुन काम केले, त्याचा हा पुरस्कार आहे. कुटुंबातील हा सत्कार अधिक महत्वाचा वाटतो. सध्या जि. प. टिंगल टवाळीचा विषय झाली आहे. १९७२ च्या दुष्काळात जिल्ह्य़ातील ५ लाखापैकी ४ लाख मजूर एकटय़ा जि. प. यंत्रणेने सांभाळले, पदाधिकारी व अधिकारी एकत्र आल्यास काय होऊ शकते हे दाखवून दिले.
आपल्याला जि. प.मध्ये काम केल्याचा अभिमान वाटतो, असे सांगुन गडाख म्हणाले, सध्या राजकारण म्हणजे वाईट माणसे, सहकारी संस्था म्हणजे बजबजपुरी, अशी भावना पांढरपेशात, शहरांत निर्माण झाली आहे. हा गैरसमज दूर करण्याचे काम आपल्या पुस्तकामुळे थोडे तरी झाले, याचे समाधान आहे. जिल्ह्य़ात राजकारण, भांडणे, गटबाजी असली तरी जिल्हा पुरोगामी विचारांचा आहे, त्याची मशागत डाव्या विचारांनी झाली आहे. स्वातंत्र्यानंतर ते शेतकरी, कामगारांच्या प्रश्नासाठी झगडले, त्याच पावलावर भावी पिढी चालली आहे, स्वातंत्र्यानंतर जिल्ह्य़ात सहकार व शिक्षण क्षेत्रात खुप मोठे काम झाले. काही गुण दोष असतीलही, परंतु त्यामुळेच दुष्काळाची तीव्रता जास्त जाणवत नाही. या कामाचा इतिहास पुस्तक रुपाने लिहण्याची आवश्यकता आहे.
गडाख यांची तिन्ही पुस्तके ग्रामीण भाग व शेतीतील स्थित्यंतरांचा इतिहास सांगणारी, जगण्याची धडपड करत असतानाचा विकासाची झेप कशी घेता येते हे सांगणारी तसेच माणुस, माती व संस्कृती यांच्याशी एकरुपता दाखवणारा दस्ताऐवज असल्याचा गौरव कुवळेकर यांनी केला. गडाख यांनी राजकारण, साहित्य, शिक्षण, कला अशा विविध क्षेत्रात कतृत्व दाखवले ते कोणाच्या मेहेरबानीने नाही तर स्वकतृत्वाने, माणसाच्या मनातील माणुसकीचे झरे आटत चालले असताना गडाख यांनी दिपस्तंभ बनुन काम करावे, असेही अवाहन त्यांनी केले.
लंघे, माजी आमदार नरेंद्र घुले, जि. प. सदस्य सत्यजित तांबे व प्रतिभाताई पाचपुते यांची समयोचित भाषणे झाली. उपाध्यक्ष मोनिका राजळे यांनी प्रास्ताविक केले. सभापती हर्षदा काकडे, बाबासाहेब तांबे, कैलास वाकचौरे, शाहुराव घुटे व सीईओ रवींद्र पाटील यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पावडे यांनी आभार मानले.
आजी, माजी पदाधिकाऱ्यांची हजेरी
कार्यक्रमास जि. प.चे सर्व माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींना निमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे रामनाथ वाघ, बाबासाहेब पवार, अरुण कडु, अशोक भांगरे, बाबासाहेब भोस, घुले तसेच बन्सीभाऊ म्हस्के, सुभाष पाटील, आण्णासाहेब शेलार, सुजित झावरे, सीताराम देशमुख, अनेक पंचायत समित्यांचे सभापती जि. प.मध्ये प्रथमच एका व्यासपीठावर आले. त्यांचाही सत्कार करण्यात आला. असा नव्या जुन्यांचा संगम राज्यात क्वचितच कोठे पहायला मिळेल, असे कुवळेकर यांनी सांगितले. यावेळी गडाख यांनी आपल्या पहिल्याच ‘कधी तरी आयुष्यात मेंटली अनफीट व्हा’ या कवितेचे वाचन केले.