प्रेमिकांचा दिवस असलेल्या ‘व्हॅलेंनटाइन डे’चा वेगळा आविष्कार घडवित शहरातील तरुण-तरुणींनी कोल्हापूर टोल मुक्तीचे आंदोलन केले. या आंदोलनात विविध शाळा, महाविद्यालयांतील पाचशेहून अधिक युवक-युवती सहभागी झाले होते.     
कोल्हापूर टोल मुक्त करण्यासाठी स्थानिक पातळीवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आज ‘व्हॅलेंनटाइन डे’चा आयाम देण्यात आला. त्यासाठी युवापिढी हातात गुलाबपुष्प घेऊन रस्त्यावर उतरली होती. कोल्हापूर टोलमुक्त करण्याची शपथ ताराराणी चौकात घेण्यात आली. तेथून टोल नाक्याकडे दुचाकी रॅली काढण्यात आली. राज्य शासन आणि आयआरबी कंपनीचा निषेध नोंदविण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. ताराराणी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर या उपक्रमाला सुरुवात झाली. गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखाली झालेले हे आंदोलन आजवरच्या टोलविरोधी आंदोलनात वेगळेपण अधोरेखित करणारे होते.