ठाणे शहरातील तीन पेट्रोल पंप, गजानन महाराज चौक परिसरातील वाहतूक व्यवस्थेत करण्यात आलेला बदल हा व्यवहार्य नसल्याने स्थानिक नागरिकांनी केलेले आंदोलन किंवा गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे तक्रारी केल्यावर त्यांनी या बदलाचा फेरआढावा घेण्याचा आदेश दिल्यावरही वाहतूक व्यवस्था कायम ठेवण्याचा ठाणे वाहतूक पोलिसांचा हट्ट एका वृद्धेच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे. वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेतील बदल फारच प्रतिष्ठेचा केल्याने एका महिलेच्या मृत्यूनंतरही पोलीस यंत्रणा जागी होण्याची शक्यता कमीच आहे.
राम मारुती मार्ग, तीन पेट्रोल पंप आणि गजानन महाराज चौक या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत गेल्या मे महिन्यात बदल करण्यात आला, तेव्हाच स्थानिक नागरिकांनी या बदलाला विरोध केला होता. विशेषत: राम मारुती मार्ग विस्तारित आणि गजानन महाराज चौकात भरधाव वेगाने वाहने येत असताना पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे कठीण होते. ही बाब स्थानिकांनी ठाण्याच्या ‘कार्यक्षम’ वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आणली, पण वाहतूक पोलीस ऐकून घेण्याच्या मन:स्थितीतच नव्हते. हा बदल फायदेशीर ठरल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. या बदलाच्या विरोधात स्थानिक रहिवासी रस्त्यावर उतरले, धरणे धरले, पण वाहतूक पोलिसांनी त्याला काहीही दाद दिली नाही. नौपाडा विभागातील मनसेचे नेते नैनेश पाटणकर यांनी महितीच्या अधिकारात मिळविलेल्या माहितीनुसार, या बदलाच्या विरोधात सादर झालेल्या निवेदनांमध्ये ७० टक्के लोकांनी विरोध दर्शविला होता. विशेष म्हणजे ही माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली होती.
वाहतूक पोलीस ऐकत नसल्याने भाजपचे माजी आमदार संजय केळकर, मनसेचे संदीप पाटणकर, शिवसेनेचे हेमंत पवार, रिक्षा संघटनेचे रवी राव आदींनी मोर्चा काढून आंदोलन केले. स्थानिक रहिवाशांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेऊन त्यांचे वाहतूक पोलिसांच्या मनमानीकडे लक्ष वेधले. आर. आर. पाटील यांनी पोलीस आयुक्त रघुवंशी यांना वाहतूक व्यवस्थेचा फेरआढावा घेण्याचा आदेश दिला, पण वाहतूक पोलिसांनी हा विषय फारच प्रतिष्ठेचा केल्याने पोलीस आयुक्त रघुवंशी यांनीही वाहतूक पोलिसांचीच री ओढली. परिणामी स्थानिकांचा विरोध असूनही वाहतूक व्यवस्था कायम ठेवण्यात आली. रविवारी गजाजन महाराज चौकात भरधाव वेगात येणाऱ्या बसची धडक बसून अरुंधती कटंक या ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या माजी पदाधिकारी मृत्युमुखी पडल्या. या परिसरात तीन शाळा आहेत. दुपारी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी मोठय़ा प्रमाणावर वाहतूक असते.  या बदलामुळे दोन सिग्नल कमी झाले हा वाहतूक पोलिसांचा दावा योग्य आहे, पण राम मारुती विस्तारित मार्ग आणि गजानन महाराज चौकात पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी काहीच उपाय योजण्यात आलेले नाहीत. ठाणे महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस पादचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाहीत, अशी तक्रार समाजसेवक मनोहर पणशीकर हे नेहमीच करीत आले आहेत, पण दोन्ही यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करतात. तीन पेट्रोल पंपाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या वाहनांना भलामोठा वळसा घालून जावे लागते. यामुळे इंधन बचत कशी होते हा वाहतूक पोलिसांच्या दाव्याचा खुलासा होऊ शकत नाही.
एका वृद्धेच्या मृत्यूनंतर स्थानिक नागरिकांनी पुन्हा गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे दाद मागायची ठरवली आहे. यापूर्वी तीन हात नाका परिसरातील वाहतूक बदलास स्थानिकांचा विरोध झाल्यावर तत्कालीन उपायुक्त देशमाने यांनी हा विषय प्रतिष्ठेचा न करता वाहतूक बदल रद्द केला होता. मात्र वाहतूक पोलिसांनी हा बदल फारच प्रतिष्ठेचा केल्याने सारी गुंतागुंत झाली आहे.