वन्यप्राण्यांच्या उपचारासाठी प्रस्तावित ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’चे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हे सेंटर उपचाराच्या सर्व साहित्यानिशी सज्ज होत आहे. ‘रेस्क्यू ऑपरेशन्स’मधील वन्यप्राण्यांवर उपचार करणे आणि उपचारानंतर त्वरित त्यांना जंगलात सोडणे, हा या सेंटरमागचा हेतू आहे. भारतात वन्यजीव उपचार केंद्रे आहेत, पण उपचार करुन वन्यजीवांना जंगलात सोडण्यात येणारे हे राज्यातील पहिले सेंटर ठरणार आहे.
मानव-वन्यजीव संघर्ष आणि जंगलालगतचे राष्ट्रीय महामार्ग यामुळे वन्यप्राण्यांच्या जखमी होण्याचे आणि मृत्युचे प्रमाण गेल्या दहा वर्षांत प्रचंड वाढले आहे. त्यामुळे नागपूर व आसपासच्या परिसरात अशा कोणत्याही घटना घडल्यानंतर सेमिनरी हिल्स येथे सर्व वन्यप्राणी उपचारासाठी आणले जातात. तात्पुरत्या उभारलेल्या कापडी भिंतीच्या आत आणि गंजलेल्या उपचाराच्या पिंजऱ्यात त्यांच्यावर उपचार करण्यात येतात. उपचाराची कायमस्वरुपी यंत्रणा याठिकाणी नसल्यामुळे अनेक वन्यप्राणी या गंजलेल्या पिंजऱ्यात अडकून पडले तर काही मृत्युपंथाला लागले. कित्येक वन्यप्राण्यांना नागपूरच्या महाराजबाग प्राणीसंग्रहालयाने आश्रय दिला. त्यातून ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ची संकल्पना समोर आली. वनविभाग आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी या सेंटरकरिता पुढाकार घेतला. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहकार्याने सेंटरचा आराखडा तयार करण्यात आला. २०१२ मध्ये हा आराखडा राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आणि २०१३ मध्ये ६३ लाख ३८ हजार रुपयांच्या या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
दरम्यान, सेंटर उभारायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर सेमिनरी हिल्स येथील नीलगायींचा परिसर रिकामा झाल्यामुळे, त्या जागेवर सेंटरच्या उभारणीचे काम सुरू झाले. तत्पूर्वी सेंटरचा मांडणी नकाशा तसेच विस्तृत नकाशा वास्तू विशारदांकडून मंजूर करून घेऊन मगच काम सुरू करावे, असे निर्देश राज्य सरकारने दिले. वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी या सेंटरसाठी एक कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली व सेंटरच्या मार्गातील अडथळे दूर करण्याचे निर्देश वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार या सेंटरच्या उभारणीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले.
वन्यप्राण्यांच्या(वाघ, बिबट) उपचाराकरिता नाईट शेल्टर व ओपन एन्क्लोजरला जोडून असलेले ट्रिटमेंट केज या सेंटरमध्ये असणार आहे. उपचार झाल्यानंतर मोकळ्या जागेत वन्यप्राणी फिरू शकले पाहिजे, हा यामागचा उद्देश आहे. त्याचवेळी हरीण प्रजातीसाठी दोन जुने शेड दुरुस्त करण्यात येत असून, ट्रीटमेंट केजमध्ये ते रुपांतर केले जात आहेत. वाघांसाठी तीन ट्रिटमेंट केज व दोन ट्रान्सपोर्ट केज, तर बिबटय़ांसाठी दोन ट्रिटमेंट केंज व दोन ट्रान्सपोर्ट केज असणार आहे.
या सेंटरकरिता एक वनपरिक्षेत्र अधिकारी, दोन वनपाल, चार वनरक्षक व सहा वनमजूर अशी चमू कायमस्वरुपी तैनात करण्यात आली आहे. एक कायमस्वरुपी पशुवैद्यकीय अधिकारी व पशुवैद्यक महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टर व त्यांचे विद्यार्थी या सेंटरला सेवा देणार आहेत.

असे आहे ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’
४० बाय ६० फुटाचे ओपीडी
२० बाय २० फुटाचे ऑपरेशन थिएटर
२० बाय २० फुटाचे पशुवैद्यक कक्ष
१५ बाय २० फुटाचे फूड स्टोअर
शवविच्छेदनाकरिता स्वतंत्र खोली
जखमी वन्यप्राण्यांना घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता निवास