महामार्गावरही नव्या प्रकल्पांची आखणी
 सल्लागार नेमणुकीसाठी निविदा मागविल्या
 जोडरस्ते, उड्डाणपुलाची आखणी होणार
ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलावा यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात नव्या प्रकल्पांची जंत्री मांडणाऱ्या महापालिकेने शहराला विभाजून जाणाऱ्या पूर्व-द्रुतगती महामार्ग तसेच घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या पायाभूत सुविधांचा फेरआढावा घेण्यासाठी वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरातील अंतर्गत वाहतुकीवर ‘प्रभाव’ पाडणाऱ्या या दोन्ही मार्गावरील भविष्यातील वाहतुकीचे नियोजन कशाप्रकारे करता येईल याचा सविस्तर अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला असून वाहतूककोंडीचे आगार समजल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरील वाहतुकीचे नव्याने सर्वेक्षण हाती घेण्यात येणार आहे. अर्थसंकल्पात महामार्ग तसेच घोडबंदर रस्त्यास लागून काही नवे उड्डाणपूल तसेच जोडरस्त्यांची घोषणा करण्यात आली आहे. हे प्रकल्प प्रत्यक्षात ऊतरविण्यापुर्वी या मार्गावरील वाहतुकीचे सर्वेक्षण महत्वाचे ठरणार आहे.
ठाणे महापालिकेने यावर्षीच्या अर्थसंकल्पात वाहतुकीला सोयीचे ठरतील, अशा काही नव्या प्रकल्पांची घोषणा केली आहे. शहरातील अंतर्गत वाहतुकीसोबत १९ किमी अंतराचा ठाणे बायपास रस्ता, राष्ट्रीय उद्यानात १२ किमी अंतराचा निसर्गरम्य रस्ता, याशिवाय पर्यायी सेवा रस्त्यांचे जाळे (सव्‍‌र्हिस रोड), उड्डाणपुलांची आखणी अशा एकामागोमाग एक घोषणा करत शहरातील वाहतुकीला विकास प्रकल्पांचा वेग देण्याचे सूतोवाचही या अर्थसंकल्पात करण्यात आले आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा भागातील वाहतुकीच्या नियोजनावर भर देताना सार्वजनिक वाहतूक पर्यायांवर विचार करण्यासाठी महापालिकेने यापूर्वीच सल्लागार नेमला आहे. अंतर्गत वाहतुकीसाठी रेल्वे स्थानकापासून गोखले मार्गावरुन पूर्वद्रुतगती महामार्गापर्यंत भुयारी वाहतूक मार्गाचे सुतोवाचही या अर्थसंकल्पात करण्यात आले आहे. याशिवाय ठाणे शहराच्या खाडीकिनाऱ्यालगत १९ किलोमीटर लांबीचा बायपास रोड उभारण्याचा संकल्प सोडण्यात आला असून अवजड वाहतुकीच्या नियमनासाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे. जेएनपीटी तसेच ऐरोलीमार्गे पूर्व-द्रुतगती महामार्गावरुन घोडबंदर मार्गाचा वापर करणारी अवजड वाहतूक या बायपास रोडवरून वळविण्याचा महापालिकेचा संकल्प आहे. एकीकडे या मोठय़ा प्रकल्पांची आखणी करत असताना पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाढत्या वाहतुकीचा ताण ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीवर पडू नये, यासाठी अभियंता विभागाने आता नव्याने आखणी सुरू केली आहे. महामार्गाला लागून काही नवे उड्डाणपूल तसेच जोडरस्ते उभारण्याचे सूतोवाच यापूर्वीच अभियंता विभागाने केले आहे.  या पाश्र्वभूमीवर महामार्गावरील वाहतुकीचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी कोणते प्रकल्प हाती घेणे शक्य आहे, याचा सविस्तर आराखडा तयार करण्यात येईल, अशी माहिती अभियंता विभागातील सूत्रांनी वृत्तान्तला दिली. घोडबंदर रस्त्यावरील वाहतूककोंडीमुळे या भागातील प्रवासी हैराण झाले आहे. या मार्गावर तीन उड्डाणपूल उभारूनही नव्याने वाहतुकीचे सर्वेक्षण करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातून अहमदाबाद महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा मोठा भार घोडबंदर मार्गावर पडत असतो. घोडबंदर मार्गालगत गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर नागरी वस्ती उभी राहिली असून तेथील वाहतुकीचा भारही याच मार्गावर पडतो. त्यामुळे घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या नियोजनाची नव्याने आखणी करण्याची आवश्यकता असून सल्लागारामार्फत यासंबंधीचे प्रकल्प आराखडे तयार करुन घेण्यात येणार आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले.