कौटुंबिक परिस्थिती संपूर्णपणे विपरित असतानाही सातत्याने सराव, विषय शिक्षकांचे मार्गदर्शन आणि वैयक्तीक टिपणे या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास यश आपल्यापासून दूर राहू शकत नाही, हे कळवण येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्पाच्या बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांनी सिध्द केले आहे. कळवण येथे प्रकल्पातंर्गत येणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील कला आणि विज्ञान शाखेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बारावीतील विद्यार्थ्यांना सोमवारी प्रकल्प अधिकारी गजेंद्र केंद्रे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याप्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांनी हीच भावना व्यक्त केली.
एकात्मिक आदिवासी प्रकल्पातंर्गत शासकीय १० आणि दोन अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे. यामध्ये दोन हजारपेक्षा अधिक विद्यार्थी बारावी कला व विज्ञान शाखेचे शिक्षण घेत होते. १२ महाविद्यालयांचा बारावी परीक्षेचा सरासरी निकाल ९८.१६ टक्के लागला. यामध्ये अलंगुन, दहिंदुले, दळवट व नरूळ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. तसेच अंबुपाडा (९६.७०), कनाशी (९८.१३), चणकापूर (९९.३७), नरूळ (९६.९२), गणोरे (९८.९१), कळवण (९८.७३), साल्हेर (१००), माने (८२.८०) या महाविद्यालयांचा समावेश आहे. विज्ञान शाखेत दळवट येथील राहुल चौरे (८०.५०), योगेश जाधव (७८.१७), अलंगुन येथील ललिता गावित (७८.१७), दहिंदुले येथील विशाखा बागूल (७६.६६), कला शाखेत दळवट येथील सचिन बागूल (७८.९०), अलंगुन येथील जगन म्हसे (७७.८३), दहिंदुले येथील संगीता महाले (७७.६६) आणि नरूळ येथील जिजा गायकवाड (७६.६७) या यशस्वी विद्यार्थ्यांना कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. यावेळी  केंद्रे यांच्यासह सहाय्यक प्रकल्प अधिकारी आर. डी. केदार, शिक्षण विस्तार अधिकारी जी. एस. खंडेवाल, केंद्र प्रमुख एस. के. पगार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक एन. एच. वाघ, एस. के. सावकार, एस. एस. भामरे, डी. एन. निकम यांचे मार्गदर्शन लाभले. दळवट आश्रमशाळेतून विज्ञान शाखेत प्रथम आलेल्या राहुल चौरेने आपल्या यशाचे गमक सातत्याने सराव, शिक्षकांचे मार्गदर्शन असल्याचे सांगितले. त्याला पुढील शिक्षण वास्तूशास्त्र विषयात पूर्ण करायचे आहे. अलंगुन आश्रमशाळेतील ललिता गावित विज्ञान शाखेत मुलींमध्ये पहिली आली.
वर्गात शिकताना शिक्षकांनी दिलेले संदर्भ तसेच पुस्तक , अपेक्षित प्रश्नसंच, मार्गदर्शक पुस्तिका यांच्या आधारावर आपण अभ्यास केला. याशिवाय महाविद्यालयाच्या वतीने सातत्याने प्रत्येक विषयाच्या पाच सराव परीक्षा झाल्याने परीक्षेची भीती नाहीशी झाल्याचे तिने नमूद केले. तिला एटीडी पूर्ण करून विज्ञानाची पदवी प्राप्त करावयाची आहे. यानंतर शासकीय सेवेच्या विविध परीक्षा देण्याचा तिचा मानस आहे. दळवट आश्रमशाळेतील सचिन बागूल ७८.९० टक्के गुण मिळवून कला शाखेत पहिला आला. महाविद्यालयात तसेच घरी जेव्हा वेळ असेल तेव्हा सातत्याने अभ्यास केला.
यापुढे त्याला इलेक्ट्रॉनिक विषयात आयटीआय करायचे आहे. मुलींमध्ये दहिंदुले येथील संगिता महाले ७७.६६ टक्के गुण मिळवून पहिली आली. सराव परीक्षांमुळे अभ्यासात अधिक मदत झाल्याचे मत तिने मांडले. पोलीस होण्याची तिची इच्छा आहे.