गेल्या दोन वर्षांत मी विद्यापीठासाठी काय केले, यापेक्षा विद्यापीठाने मला काय दिले, येथील अनुभवाने मला किती समृद्ध केले, नवे काही शिकविले हे मला जास्त महत्त्वाचे वाटते. माझे मूल्यमापन करण्याचा अधिकार या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना, पालकांना, प्राध्यापकांना, सामान्य जनतेला व कुलपतींना आहे. दोन वर्षांत विद्यापीठाला नवी दिशा, नवा विचार देण्याचा मी थोडाफार प्रयत्न केला, असे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी आपल्या कारकिर्दीबाबत लेखी स्वरूपात व्यक्त केलेल्या ‘मनोगतात’ मध्ये म्हटले आहे.
सध्या एकूणच उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये संभ्रमावस्था आहे. आपण सर्व परिवर्तनाच्या उंबरठय़ावर उभे आहोत. जागतिकीकरण, व्यापारीकरण, विज्ञान-तंत्रज्ञानाची गरुडझेप, औद्योगिकीकरणातील गुणवत्तेच्या वाढत्या आशा-अपेक्षा यांचा परिणाम शिक्षणक्षेत्रावर होणे स्वाभाविक आहे. दुर्दैवाने या घोडदौडीत आपण सारेच मागे पडतो आहोत, रेंगाळत आहोत. मागे राहिल्यामुळे आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहोत. आपलेच नुकसान करीत आहोत, याची जाणीवही आपल्याला होत नाही. कुठेतरी मनोवृत्तीत बदल होणे गरजेचे आहे. माझे बहुतांशी प्रयत्न यासाठीच आहेत, असे डॉ. पांढरीपांडे यांनी म्हटले आहे.
विद्यापीठातील विविध विभागांचे एकत्रीकरण, एकत्रित संशोधन, सामाजिक समस्यांचे विद्यार्थ्यांना आकलन, शिकविण्यापेक्षा शिकण्याकडे जास्त कल, घोकंपट्टीऐवजी समस्या समजून ती सोडविण्यासाठी सामूहिक पद्धतीने अभ्यासपूर्ण चिंतन, अंतर्गत शिस्तीच्या स्वरूपाचे अभ्यासक्रम व समाजोपयोगी संशोधन यावर भर देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. त्यासाठी औद्योगिक संस्थांचा सहभाग (अध्यापन, संशोधन व विकास) तितकाच गरजेचा आहे. यासाठी विविध उद्योगसमूहातील जबाबदार अधिकाऱ्यांशी केवळ चर्चा झालेल्या नाहीत, तर काही गोष्टी कार्यान्वितही केल्या आहेत. इ अ‍ॅण्ड एफ तर्फे तसेच बजाज समूहातर्फे (बागला स्कॉलरशिप) मिळालेल्या शिष्यवृत्त्या वोखार्ड, इन्फोसिसशी झालेले-होणारे करार, विज्ञान-तंत्रज्ञान विभागातर्फे अत्याधुनिक संशोधनासाठी मिळाली रामानुजम् चेअर, ‘डीआरडीओ’ च्या वरिष्ठ वैज्ञानिकांच्या भेटी व त्यांचा प्राध्यापक-विद्यार्थ्यांशी संवाद, ‘नॅक’ चे अध्यक्ष, माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट, राज्यातील मुंबई, पुणे, नांदेड, नाशिक, नागपूर, जळगाव, आदी विद्यापीठांच्या कुलगुरूंनी विद्यापीठास वेळोवेळी दिलेल्या भेटी, या निमित्ताने त्यांच्याशी विविध प्रकल्पांवर झालेली चर्चा या बाबी ‘बामु’ ला पुढे नेण्यासाठी, नवी उंची प्रदान करण्यासाठी पूरक ठरल्या आहेत. विद्यापीठाच्या विकासात आजी-माजी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे हे विद्यापीठाचे लक्ष्य आहे. त्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
अधून-मधून डोके वर काढणारी बेशिस्त ही निश्चितच चिंतेचा विषय आहे. विद्यापीठाचा कुटुंबाचा आपण एक हिस्सा आहोत, ही जबाबदारीची जाणीव विद्यापीठाशी संबंधित प्रत्येक घटकाने ठरविल्यास ही बेशिस्त भविष्यात दिसणार नाही, असा विश्वास डॉ. पांढरीपांडे यांनी व्यक्त केला.

ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
Law College Student Attendance
विधी महाविद्यालय विद्यार्थी उपस्थिती : ७५ टक्के उपस्थितीच्या नियमाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्याची न्यायालयाला मागणी
High Court relief
वैद्यकीय विषयाच्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, पुनपर्रीक्षेची गुणपत्रिका देण्याचे राज्य शिक्षण मंडळाला आदेश