खैरीनिमगाव येथील जयश्री हॉटेलचा वेटर मनोज स्वामी याचा महिन्यापूर्वी अत्यंत अमानुषपणे खून झाला. मात्र पोलिसांच्या तपासात अद्यापि कोणतीही प्रगती झाली नसून हे प्रकरण आता दडपले गेल्याचीच चर्चा होत आहे.
पुणतांबे रस्त्यावरील खैरीनिमगाव शिवारात असलेल्या जयश्री हॉटेलवर एक महिन्यापूर्वी औरंगाबाद येथील मनोज स्वामी या वेटरच्या डोक्यात लोखंडी गजाने प्रहार करून त्याला बाजेला बांधून त्याच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्यात आले होते. तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक कैलास पुंडकर यांनी सुरुवातीपासून या गुन्ह्याचा तपास करताना उणिवा ठेवल्या. गुन्ह्याचे गांभीर्य कमी करण्यासाठी हॉटेलचालक संतोष भवार यांची फिर्याद घेऊन केवळ हॉटेलमधील वेटर दिलीप पोपट सोनार याला एकालाच आरोपी बनविण्यात आले. मुळातच जयश्री हॉटेल हे गेल्या वर्षापासूनच वादग्रस्त बनलेले होते. ते अनेक गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनलेले होते. खुनाच्या काही दिवस अगोदर गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या गुन्हेगारांनी हॉटेलवर हल्ला केला होता. नंतर हॉटेलमध्ये चोरी झाली होती. त्यामुळे हॉटेलला पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता. असे असूनही वेटरच्या खुनाची घटना घडली.
मनोज स्वामी या वेटरचा खून करणा-या आरोपींची उघडपणे चर्चा होत आहे. या गुन्हेगारांशी अनेकांचे संबंध असून काही पोलिसांचेही त्यांच्याशी लागेबांधे आहेत. संबंधित गुन्हेगारांना पोलिस निरीक्षक पुंडकर यांनी अभय दिले असून त्यांची साधी चौकशीही करण्यात आलेली नाही. उपाधीक्षक अंबादास गांगुर्डे हे निष्क्रिय आहेत. त्यामुळे आता अतिरिक्त पोलिस अधिक्षीका सुनीता साळुंके-ठाकरे यांनी खूनप्रकरणात लक्ष घातले आहे.
संशयित आरोपी सोनार हा मनमाड येथील असून त्याच्या घरी आई एकटीच आहे. परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने ती मोबाइलही वापरू शकत नाही. तसेच सोनार यानेही मोबाइल वापरणे बंद केले आहे. त्याचा शोध घेण्यासाठी आता पोलिसांपुढे कुठलाही मार्ग शिल्लक नाही. पोलिसांनी तपास करताना त्याने खून करण्यापूर्वी कोणाशी संपर्क केला होता हे अजूनही तपासण्यात आलेले नाही. आता निरीक्षक पुंडकर यांनी आरोपी सोनार याचे मोबाइल रेकॉर्ड तपासण्याच्या कामाला प्रारंभ केला आहे. तब्बल एक महिन्यानंतर ही बुद्धी सुचली आहे. गुन्हेगारांची साखळी व त्याला धनदांडग्यांच्या पाठबळामुळेच खुनाचा तपास लागल्याची शक्यता कमी झाली आहे.