उमरगा येथे कार्यान्वित होणाऱ्या महसूल उपविभागीय कार्यालयावरून आता चांगलाच वाद रंगला असून हे कार्यालय उमरग्याऐवजी लोहारा येथे सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी मंगळवारी लोहारा तालुका बंदची हाक सर्वपक्षीय नेत्यांनी दिली आहे.
उस्मानाबाद व भूम येथे कार्यान्वित असलेल्या महसूल उपविभागीय कार्यालयाचे विभाजन करून उमरगा व कळंब अशी अशी दोन उपविभागीय कार्यालये मंजूर करण्यात आली आहेत. ती स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टपासून सुरू करण्यात येत आहेत. यापूर्वी उमरगा, लोहारा व तुळजापूर या तालुक्यांचे कामकाज उस्मानाबाद येथून चालत होते. उमरगा व लोहारा तालुक्यांतील जनतेला उस्मानाबादचे अंतर जास्त होते. यात वेळ आणि पशाचा अपव्यय होत असल्याची बाब लक्षात घेऊन उमरगा व लोहारा या दोन तालुक्यांसाठी उमरगा येथे हे कार्यालय सुरू करण्यात येत आहे. मात्र, उमरगा येथे कार्यान्वित होणाऱ्या या कार्यालयास लोहारा तालुक्यातील जनतेने तीव्र विरोध दर्शविला आहे. भौगोलिकदृष्टय़ा कोणतीच पाहणी न करता उमरगा येथे कार्यालय सुरू करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप तालुक्यातील नागरिक करीत आहेत.
उमरगा व उस्मानाबाद या दोन्ही तालुक्यांचा केंद्रिबदू लोहारा तालुका आहे. त्यामुळे लोहारा येथेच महसूल उपविभागीय कार्यालय सुरू करणे सोयीस्कर ठरेल. याशिवाय लोहाऱ्यामुळे उमरगावासीयांचे उस्मानाबादला जाण्याचे अंतर कमी होऊन त्यांची गरसोय दूर होईल, याचा कुठलाही विचार न करता प्रशासनाने हे कार्यालय उमरगा येथे कार्यान्वित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हा लोहारा तालुक्यावरील अन्याय असून याचा फेरविचार करावा, अशी मागणी नागरिकांनी तहसीलदारांकडे केली आहे.
या मागणीसाठी शिवसेना, भाजप, रिपाइं आदी पक्षांनी मंगळवारी तालुका बंदची हाक दिली आहे. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर रिपाइंचे तालुकाप्रमुख दिगंबर कांबळे, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, भाजपचे अनिल ओवांडकर, कल्याण ढगे, बाबा शेख, शंकर मुळे आदींची स्वाक्षरी आहे.