कवी विवेक उगलमुगले यांच्या ‘सांगावेसे वाटते म्हणून’ हा काव्यसंग्रह म्हणजे उगलमुगले यांनी वडिलांना पहिल्या स्मृतीदिनी वाहिलेली ‘शब्दांजली’ असून दोन पिढय़ांमधील विचारधारा या माध्यमातून समोर येत असल्याचे मनिषा कुलकर्णी यांनी नमूद केले आहे.
या काव्यसंग्रहाविषयी मत मांडताना कुलकर्णी यांनी त्याची वैशिष्टय़ेही मांडली आहेत. उगलमुगले यांचे वडील चिंतामण उगलमुगले यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू या काव्य संग्रहाच्या माध्यमातून उलगडतात.
वडिलांना परमेश्वर मानले तरी त्यांच्या विषयी असणाऱ्या लटक्या तक्रारी, कुठल्या तरी कारणावरून वडिलांविषयी मनात आलेली अढी, वडिलांचा जनसंपर्क, सर्वसामान्यांवरील त्यांचा प्रभाव आदी पैलुंचा अभ्यास करतांना समोर येते. एक अस्सल निरसपाणी व्यक्तिमत्व जे शब्दांच्या चिमटीत कधीच बसवता आले नाही. गद्य रचनेचा आधार घेत अण्णांचे व्यक्तिचरित्र रेखाटण्याचा प्रयत्न कविने केला आहे. वडिलांच्या काटकसरी स्वभावाविषयी तक्रार करतांना त्यांनी ‘मला समजतंय’ या कवितेत-
एरव्ही ते पाच दहा पैसेही द्यायला
कंजुषीच करायचे
संपूर्ण कॉलेजच्या शिक्षणापर्यंत माझे खिसे राहिले काटेकोर कडक
परंतु भारत जोडोच्या यात्रेत नाशिकला
बाबा आमटेंना पहायला, ऐकायला
चंद्रशेखरजींच्या भारत यात्रेत
पिंपळगावला सहभागी व्हायला
पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात
साथी एसेम जोशींना पहायला नेतांना
ते होते माझ्यासाठी एक उदार कर्ण
या प्रमाणे वडिलांचा स्वभाव मांडला आहे. रोजच्या जीवनात त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनून राहिलेल्या सायकलीची आठवण ‘कृतज्ञ नमस्कार’ मधून जागविली. मुलांसाठी आठवडे   बाजारातून  खाऊ आणणाऱ्या अण्णांचे लोभस व्यक्तिमत्व उगलमुगले यांनी ‘चैन शिकरण   पोळीची’    मधून    मांडले   आहे.
उगलमुगले यांनी या संग्रहात वडील गेल्यानंतरच्या आठवणी नमूद केल्या आहेत. यामध्ये पितृछत्र हरविल्यानंतर आलेले पोरकेपण प्रकर्षांने जाणवते.
काव्यसंग्रहाचे दुसरे वैशिष्टय़े म्हणजे यावर मूल्य नाही, म्हणजेच आशयाच्या दृष्टीने ते अमूल्य  असल्याचे  कुलकर्णी यांनी म्हटले आहे.