तालुक्याच्या पूर्व भागात विशेषत: पाण्याच्या शोधात भटंकती करणाऱ्या हरणांचे बळी जाण्याचे सातत्य तीन महिन्यानंतरही कायम असल्याने वन कर्मचाऱ्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बुधवारी सायगाव येथील भालेराव वस्तीजवळ विहिरीत पडून तसेच फरताळवाडीत मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन हरणांना प्राणास मुकावे लागले.
तालुक्यात फेब्रुवारी महिन्यापासून विशेषत: डोंगराळ भागातील रहाडी, खरवंडी, भारम, ममदापूर, रेंडाळे, राजापूर, वाघाले, डोंगरगाव, तळवाडे, अंगुलगाव, आडसुरेगाव आदी गावांतील विहिरींच्या पाण्याची पातळी कमालीची खोल गेली आहे. प्रामुख्याने तालुक्याच्या पूर्वोत्तर भागात हरणे व काळविटांची संख्या अधिक आहे. यावर्षी कमी पावसामुळे नाल्यांना पाणी गेले नाही. त्यामुळे हरणांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला.
वन्य प्राणी संरक्षण संघटनेने जानेवारी महिन्यातच मार्चनंतर प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याचा इशारा दिला होता. परंतु संबंधितांनी त्वरित दखल न
घेतल्याने हरणांसह अन्य प्राणी व  पशु-पक्ष्यांच्या पाण्याचा प्रश्न तीव्र झाला आहे.
उष्णता दिवसेंदिवस वाढतच आहे. फेब्रुवारीपासून पाण्याच्या शोधासाठी धावणाऱ्या १६ हरणांना जीव गमवावा लागला असून, त्यात प्रामुख्याने मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात १४, तर विहिरीत पडून तहानलेल्या दोन हरणांचा समावेश आहे. जंगलात छोटी तळी बांधून त्यात टँकरद्वारे पाणी टाकल्यास हरणे वाचविण्यासारखी साधी गोष्टदेखील वन विभागाला करता येत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.