लातूर जिल्हय़ात बहुतेक ठिकाणी गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला.हडोळती, देवणी, औसा, उदगीर, जळकोट भागात वादळी वारे व अवकाळी पावसामुळे झाडे उन्मळून पडली. त्यामुळे काही भागातील वीज खंडित झाली. चाकूर तालुक्यातील देवंग्रा येथे दत्तू राम सोनवणे (वय ४५) यांचा वीज पडून मृत्यू झाला.
औसा तालुक्यात गुरुवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील काजळी चिंचोळी येथील बाबूराव गुरव (वय ६०) शेतात काम करीत असताना अंगावर वीज पडून जागीच ठार झाले. त्यांच्याशेजारी काम करीत असलेले काशिनाथ लोखंडे जखमी झाले. भादा येथे कडब्याच्या गंजीला आग लागून जवळपास ४ हजार पेंढय़ा जळून खाक झाल्या.
लातूर तालुक्यात १० मि.मी. पावसाची नोंद झाली. कडक उन्हामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. पावसाच्या आगमनाने काही काळ नागरिकांना दिलासा मिळाला. अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
काही भागातील केळीच्या, द्राक्षांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. आंब्याचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील नागेवाडी येथे वीज पडून दोन म्हशी दगावल्या. जळकोट तालुक्यात गुरुवारी दिवसभर वीजपुरवठा खंडित होता. देवणी शहर व परिसरात विजेच्या कडकडाटासह सुमारे १ तास पाऊस पडला. वलांडी परिसरात बसस्थानकावरील पत्रे उडून गेले.