नागपूर शहराचा झपाटय़ाने विस्तार होत असताना शहरातील समस्याही तेवढय़ाच गतीने वाढत चालल्या आहे. जागा मिळेल त्या जागी ‘लेआऊट किंवा अपार्टमेंट’ निर्माण झाल्यामुळे शहराचा विस्तार झाला मात्र त्या ठिकाणी अद्यापही नागरी सुविधा पुरवण्यात महापालिकेला फारसे यश आले नाही. पावसाळ्यात अपघातांना कारणीभूत ठरणारी मॅनहोल्सची समस्या यातूनच निर्माण झाली आहे. नागनदी स्वच्छता मोहीम किंवा २४ बाय ७ च्या योजनेमुळे शहराचे नाव देशभर झाले असले तरी रस्त्यावरील उघडय़ा मॅनहोल्स आणि खड्डय़ांमुळे महापालिका टीकेचे लक्ष्यही ठरली आहे.
शहरात ठिकठिकाणी आणि विशेषत अपघातासाठी धोकादायक ठरू शकतील, अशा ठिकाणी असलेल्या मॅनहोल्सवर झाकणे नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. काही ठिकाणी तर मॅनहोल्सना कचराघर बनविल्यामुळे पाणी तुंबून रस्त्यावर आले आहे. शहरात दहा झोन असून प्रत्येक झोनमध्ये किमान ५ ते ७ हजार मेनहोल्स आहेत. धरमपेठ, लक्ष्मीनगर, रामदासपेठ, नंदनवन, मानेवाडा, जागनाथ बुधवारी, इतवारी, दहीबाजार आणि उत्तर नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये मॅनहोल्सची संख्या अधिक आहे. शहरात किमान ३ हजारापेक्षा अधिक मॅनहोल्सवर झाकणे नाहीत. जी आहेत ती तुटलेली किंवा मॅनहोल्सच्या बाजूला पडलेली दिसून येतात. झोननिहाय विचार केला तर प्रत्येक झोनमध्ये उघडय़ा मॅनहोल्सची संख्या जवळपास १०० ते १५० च्या घरात असल्याची माहिती माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.
मॅनहोल्सवरील झाकणे लावण्याचे काम वर्षभर सुरू असते, मात्र पावसाळ्यात हे काम पूर्ण होणे गरजेचे असते. या पाश्र्वभूमीवर शहरातील उघडय़ा मॅनहोल्सवर झाकणे नसणे गंभीर बाब आहे. यात प्रामुख्याने धोक्याच्या ठिकाणी असलेल्या मॅनहोल्सचा समावेश आहे. शहरात उघडय़ा मॅनहोल्समुळे यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. विशेषत: पावसाळ्यात मॅनहोल्सच्या ठिकाणी पाणी साचून राहिले तर अनेकदा ते दिसत नाही, त्यामुळे अशा ठिकाणी अपघात होण्याची जास्त शक्यता आहे. गेल्यावर्षी मॅनहोल्समुळे हिस्लॉप कॉलेज चौकात दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. वर्दळीच्या रस्त्यांवर ऐन मध्यभागी उघडे मॅनहोल्स आढळून आले. काही ठिकाणी त्यावर दगड ठेवलेले आहेत. अधिकारी आणि नेत्यांची नेहमीच वर्दळ असलेल्या सिव्हील लाईन्स भागात पदपथावरील आणि रस्त्यांवरील मॅनहोल्स झाकणाविणा असल्याचे दृश्य अनेक ठिकाणी पाहायला मिळते. या शिवाय वर्धा मार्ग, अजनी रेल्वे स्थानक ते राजीव गांधी पुतळा, कॉटन मार्केट, अमरावती मार्ग, काटोलमार्ग, गांधीबाग, सदर भागातही उघडय़ा मॅनहोल्सने महापालिकेची ‘पोलखोल’ केली आहे.
शहराच्या अंतर्गत रस्त्यावरची स्थिती याही पेक्षा वाईट आहे. रस्ते रुंदीकरण केल्यानंतर रस्त्यावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी पदपथावर मॅनहोल्स तयार करण्यात आले होते. पदपथाच्या खालून वाहणाऱ्या नाल्या स्वच्छ करण्याचा त्यामागचा हेतू होता. सध्या शहरातील अनेक पदपथांचीच अवस्था दयनीय झाली आहे. शहरातील जुन्या वस्तीत मॅनहोल्सवरील झाकणे जर्जर झाली आहेत. ती बदलवण्यासाठी म्हणून नागरिकांनी अर्ज-विनंत्या केल्या. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी नागरिकांनीच या कामी पुढाकार घेत तेथे सुरक्षेची उपायोजना केली. मॅनहोल्सवर झाकणे लावण्यासाठी यावर्षी अर्थसंकल्पात २५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त नगरसेवकांच्या वॉर्ड निधीतूनही ही कामे केली जातात. महापालिकेच्याच बांधकाम विभागाची यावर देखरेख असते. दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्ची पडल्यावरही मॅनहोल्स उघडीच असतात. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पथदिवे बंद आहेत. दाट लोकवस्तीच्या ठिकाणी, धोकादायक वळणावर आणि वर्दळीच्या रस्त्यावर धोका अधिक असतो. ही कामे पावसाळ्यापूर्वी करावी, असे आदेश महापौरांपासून तर आयुक्तांपर्यंत आणि सर्वच झोन सभापतींनी दिले मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीच झाली नाही. त्यामुळे सध्या शहरातील उघडे मॅनहोल्स धोकादायक ठरले आहेत.