पूर्णा शहरात छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर कोणीतरी व्यक्तीने महाराजांचा अर्धाकृती पुतळा बसविला. परंतु हा पुतळा पोलिसांनी जप्त केल्यामुळे शहरात सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान तणाव निर्माण झाला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, तर प्रत्युत्तरादाखल नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. या प्रकारानंतर पूर्णेत अघोषित संचारबंदीचे चित्र आहे. शहरातील व्यापारपेठ बंद करण्यात आली.
शहराच्या मुख्य बाजारपेठेत शिवपुतळ्यासाठी जागा आरक्षित केली आहे. सध्या येथे पुतळा बसविलेला नाही. दुपारी साडेचारच्या सुमारास एका जीपचा हातगाडय़ाला धक्का लागून हातगाडय़ावरील आंबे रस्त्यावर पडले. त्यामुळे वादावादी होऊन तणाव निर्माण झाला. सर्व बागवान पोलीस ठाण्यात गेले. दरम्यानच्या काळात कोणीतरी व्यक्तीने अर्धाकृती शिवपुतळा नियोजित जागेवर आणून बसवला. या प्रकारामुळे पुतळ्याजवळ नागरिकांची मोठी गर्दी जमली. पुतळ्यावरून तणाव वाढत असतानाच परभणीहून दंगल नियंत्रक पोलीस पथकाच्या दोन गाडय़ा पूर्णेत पोहोचल्या. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सुरुवातीला सौम्य लाठीमार केला. परंतु सोनारगल्लीत नागरिकांकडून पोलिसांवर दगडफेक झाल्यानंतर वातावरण चिघळले. त्यामुळे पोलिसांनी आक्रमक होत रस्त्यावर दिसेल त्याला चोप देण्यास सुरुवात केली.