यंत्रमाग कामगारांसह असंघटित उद्योगातील कामगारांना दरमहा १० हजार रुपये पगार मिळावा, या मुख्य मागणीसाठी इचलकरंजी येथे १२ कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने मंगळवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. कामगारांनी केलेल्या जेल भरो आंदोलनात पोलिसांनी २०७ आंदोलकांना अटक करून नंतर सुटका केली.
महागाईच्या तुलनेत कामगारांच्या पगारात वाढ होत नाही, शासन कामगारविरोधी धोरण राबवत आहे. यामुळे असंघटित कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी त्यांना दरमहा १० हजार रुपये पगार मिळावा, २ रुपये दराने ३५ किलो धान्य मिळावे, या मागण्यांसाठी देशभरातील कामगार संघटनांनी आंदोलन केले. या आंदोलनाला इचलकरंजीत चांगला प्रतिसाद मिळाला.    
कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली शाहू पुतळय़ापासून मोर्चाला सुरुवात झाली. शहराच्या मुख्य मार्गाने फिरून मोर्चा प्रांत कार्यालयावर आल्यावर तेथे निदर्शने करण्यात आली. कृती समितीचे निमंत्रक कॉ. दत्ता माने, मिश्रीलाल जाजू, प्राचार्य ए. बी. पाटील यांची भाषणे झाली. प्रांत तुषार ठोंबरे यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर प्रांत कार्यालयाच्या चौकामध्ये कामगारांनी जेलभरो आंदोलन केले. शिवाजीनगर पोलिसांनी कामगारांना अटक केली. या वेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने प्रांत कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.