दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूक ही कार्यकर्त्यांसाठी एक चांगली संधी ठरणार असल्याचे संकेत मिळू लागले असून कार्यकर्त्यांना जपण्यासाठी राजकीय पक्षांनी आतापासूनच मेजवानी देण्यास सुरूवात केली आहे. रविवारी दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरणावर झालेली अशीच एक मेजवानी सध्या तालुक्यात चर्चेचा विषय झाली आहे. आयोजकांच्या अपेक्षेपेक्षा अधिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे मेजवानी चांगलीच गाजली.
सैन्य हे पोटावर चालते असे म्हटले जाते. लष्करातील हेच तत्व राजकारणात कार्यकर्त्यांसाठी लागू होते. आजकाल प्रत्येक निवडणूक खर्चिक झाली असून त्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक तर, उमेदवाराची खरी परीक्षा पाहणारी ठरते. त्यापैकी लोकसभा निवडणूक तर पार पडली. आता सर्वाचे लक्ष विधासभा निवडणुकीकडे लागून आहे. लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांचा ‘भाव’ अधिक वाढतो असे म्हणतात. प्रचारासाठी कार्यकर्तेच महत्वाची कामगिरी पार पाडत असल्याने कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी प्रत्येक उमेदवार प्रयत्न करीत असतो. विधानसभा निवडणुकीची घोषणा पुढील महिन्यात होण्याची शक्यता लक्षात घेऊन इच्छूक उमेदवारांनी आतापासूनच कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी आणि आपले कार्यकर्ते विरोधकांना जाऊन मिळू नयेत म्हणून मेजवानीच्या रूपाने तटबंदी उभारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरणावर रविवारी दुपारी अशाच एका जंगी मेजवानीचे आयोजन खास कार्यकर्त्यांसाठी करण्यात आले होते. ५००-६०० कार्यकर्त्यांना या मेजवानीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यादृष्टिनेच जेवणाचा बेतही बेतानेच आखण्यात आला होता. सामिष भोजन घेणाऱ्यांची संख्या अधिक राहील हे गृहीत धरून त्याप्रमाणे व्यवस्था करण्यात आली होती. परंतु शाकाहारी कार्यकर्त्यांच्या पोटाची काळजी घेण्यासाठी ‘आंबा रस’चा बेत आखण्यात आला होता. कार्यकर्ते येण्यास सुरूवात झाल्यावर मात्र आयोजकांची पाचावर धारण बसली. कारण आमंत्रित केलेल्यांपेक्षा आमंत्रित न केलेल्यांची संख्या अधिक होती. भोजन मर्यादित आणि कार्यकर्ते अमर्यादित अशी अवस्था झाल्याने मेजवानीचा पुरता बेरंग झाला. आपल्या ताटात काहीतरी पडावे म्हणून कार्यकर्ते अक्षरश: भांडे घेऊन पळत असल्याचे दृश्य दिसू लागले. अनेक कार्यकर्त्यांना काहीही न मिळाल्याने त्यांना स्वखर्चाने बाहेर जाऊन क्षुधा शांत करावी लागली. ही मेजवानी अंगलट यावयास नको म्हणून आयोजकांनी यातून बोध घेत पुढील मेजवानीचे नियोजन अधिक काटेकोरपणे कसे करता येईल याविषयी विचारविनिमय सुरू केला आहे.

विरोधकही सरसावले..
या मेजवानीची आणि मेजवानीत झालेल्या गोंधळाची खबर विरोधकांना मिळाल्यावर त्यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसाठी मेजवानीच्या आयोजनाची तयारी सुरू केली आहे. धरणावरील मेजवानीत ज्या ज्या गोष्टींची उणीव राहिली त्या गोष्टी कार्यकर्त्यांना पुरविण्यासाठी उपाययोजना करण्यात येऊ लागली आहे. त्यामुळे सुगीचे दिवस आल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.