एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या सोने-चांदी खरेदीला अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सुवर्णनगरी म्हणून परिचित असणाऱ्या जळगावसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात ग्राहकांचा प्रतिसाद लाभल्याने अवघे सराफ बाजार झळाळून गेल्याचे पाहावयास मिळाले. पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चोख सोने खरेदी करण्याकडे अनेकांचा कल होता. तसेच लग्नसराईच्या खरेदीला हाच मुहूर्त निवडून अलंकार खरेदी करणारेही ग्राहक होते.

अक्षय्य तृतीया म्हणजे साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. या दिवशी ग्राहकांकडून प्रामुख्याने चोख स्वरूपात सोने-चांदे खरेदीला प्राधान्य दिले जाते. वर्षभराच्या काळात या दिवशी सोन्या-चांदीची मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जात असल्याने त्याचे दर किमान या दिवशी तरी चढेच राहतात, असा आजवरचा अनुभव. या वर्षी मात्र त्यास छेद मिळाल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे होते. गेल्या काही दिवसांपासून सोने ३० हजार प्रति तोळे आणि ४३ हजार रुपये किलो चांदी असे
भाव आहेत.
सोमवारी त्यात फारसा काही बदल झाला नाही. सोन्याच्या भावात काही दुकानांमध्ये १०० ते २०० रुपयांचा फरक असल्याचे लक्षात येत होते. दंडे ज्वेलर्सच्या संचालकांनी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. या ठिकाणी सोने २९,७०० रुपये प्रति तोळे तर चांदी ४३ हजार रुपये किलो असा भाव होता. तर आडगावकर ज्वेलर्स या पेढीत सोने २९,८०० रुपये तर चांदी ४५ हजार रुपये असा भाव असल्याचे सांगण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दर काहीसे कमी असल्याने बाजारात उत्साह होता. त्याचे प्रत्यंतर ठिकठिकाणी पाहावयास मिळाले.
संपूर्ण देशातील ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या जळगावच्या सराफ बाजाराबरोबर नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार भागातील सराफी पेढय़ांत सोने-चांदी खरेदीत असणारा उत्साह रात्री उशिरापर्यंत कायम राहिला. जळगाव व नाशिक येथील आर. सी. बाफना, राजमल लखीचंद, महावीर ज्वेलर्स आडगावकर व टकले सराफ, जाखडी ज्वेलर्स, नाशिक रोडस्थित दंडे ज्वेलर्स अशा बडय़ा पेढय़ांमध्ये ‘हॉलमार्क’ असणारे चोख सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा अधिक कल राहिल्याचे पाहावयास मिळाले. त्यात विशेषत: तुकडा, नाणे, वेढणी व बिस्किटांचा समावेश होता. ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी गुंतवणूक म्हणून हा मुहूर्त साधण्याकडे बहुतेकांचा कल असला तरी यंदा त्याच्या जोडीला लग्नसराईचे लाभल्याने या दिवशी अलंकार खरेदीलाही ग्राहकांकडून प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. चोख सोन्यासह अलंकार खरेदीसाठी प्रामुख्याने महिला वर्गाची गर्दी झाल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळाले. अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून मुलीच्या लग्नासाठी दागिने खरेदी करणारे अनेक ग्राहक होते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जळगाव येथे सोने-चांदी खरेदीचा मुहूर्त साधणाऱ्यामध्ये स्थानिकांबरोबर गुजरात, मध्य प्रदेश अन्य राज्यातील ग्राहकांचा मोठय़ा प्रमाणात समावेश होता. लकी ड्रॉ काढून रंगीत टिव्ही संच अथवा फ्रिज, मजुरीत विशेष सूट, गृहोपयोगी भेटवस्तू अशा वेगवेगळ्या योजना मांडून सराफ व्यावसायिकांनी ग्राहकांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे पाहावयास मिळाले. या दिवशी सर्वसामान्यांना किमान एक ग्रॅम का होईना सोन्याची खरेदी करता यावी म्हणून काही व्यावसायिकांनी हप्त्याने पैसे देण्याची व्यवस्था केली.