उरण ते नवी मुंबईदरम्यानच्या दळणवळणासाठी महत्त्वाची ठरणारी नवी मुंबई महानगरपालिकेची बससेवा गेली अनेक वर्षे रडत-रखडत सुरू असल्याने उरणमधील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यात आता एन.एम.एम.टी.ने उरण परिसरात सुरू करण्यात आलेल्या नव्या बसेसही ऐन प्रवासात नादुरुस्त होत असल्याने उरणमधील प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबईचाच एक भाग असलेल्या उरण ते नवी मुंबईदरम्यान प्रवासासाठी एस.टी. सेवा असली तरी ती अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे जेएनपीटी बंदर तसेच उरणमधील औद्योगिक विभागात दररोज ये-जा करणारे सुमारे ५० हजार कामगार एनएमएमटीवर अवलंबून असतात. नवी मुंबईतील वाशी, कोपरखैरणे, घणसोली तसेच कळंबोली आदी ठिकाणांवरून दर अध्र्या तास अथवा पंधरा मिनिटांना एक बस गाडी आहे. उरणमधील व्यावसायिक, नवी मुंबई व मुंबईत शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच जुईनगर किंवा बेलापूर येथून ये-जा करणाऱ्या कामगार- कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा जीवनवाहिनीच आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून ही बससेवा विस्कळीत होत आहे. त्यापैकी अनेक बसेस नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
या संदर्भात ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री व नवी मुंबईचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांनी आश्वासन देऊनही बसेस बंद पडण्याच्या घटना कायम सुरू आहेत.