मध्य रेल्वेतील हजारो रिक्त पदांचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे. मोटरमन, गार्ड्स, स्टेशन अधीक्षक, तिकीट बुकिंग क्लार्क आणि तिकीट तपासनीस यांच्या रिक्त जागांमुळे मध्य रेल्वेच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. मात्र ही पदे भरण्याबाबत मध्य रेल्वेकडे सध्या तरी काहीच ठोस उपाययोजना नाही. रेल्वे बोर्डाकडून या पदांबाबत निर्णय घेतला गेल्याशिवाय ही पदे भरता येणार नाहीत. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनही पेचात अडकले आहे.
मध्य रेल्वेवर मोटरमन आणि गार्ड यांची अनुक्रमे ११७ आणि २७६ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे मोटरमन आणि गार्ड यांच्यावर प्रचंड ताण पडत आहे. परिणामी या घटकांनी, ‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका,’ असा इशाराही प्रशासनाला दिला आहे. या इशाऱ्यातील गर्भित भाग म्हणजे आम्ही ‘काम बंद’ आंदोलन करू, असा आहे. या आंदोलनाचा थेट फटका प्रवाशांना किती खोलवर बसेल, हे सांगण्यासाठी कोणत्याही तज्ज्ञाची गरज नाही. मध्यंतरीच्या काळात केवळ १५ ते २० मिनिटांसाठी आंदोलन करणाऱ्या मोटरमन व गार्ड्सनी याची चुणूक दाखवली आहे, असे एनआरएमयुच्या वेणू नायर यांनी सांगितले.
स्टेशन अधीक्षक हा प्रवासी आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. मात्र अनेक स्थानकांवर स्टेशन अधीक्षकाचे पद रिक्त आहे. या स्थानकांची जबाबदारी मुख्य बुकिंग क्लार्कवर पडते. या स्थानकाच्या हद्दीत एखादा अपघात झाल्यास मुख्य बुकिंग क्लार्कला आपली तिकीट खिडकी बंद करून त्या दुर्घटनेचा ‘मेमो’ लिहिण्यासाठी घटनास्थळी धावावे लागते. परिणामी त्याचा फटका प्रवाशांना थेट बसतो. मध्यंतरी डॉकयार्ड रोडदरम्यान घडलेल्या एका घटनेत संतप्त प्रवाशांनी चक्क बुकिंग क्लार्कचे अपहरण केले होते. तरीही या पदाचे गांभीर्य अजून रेल्वे प्रशासनाच्या ध्यानी आलेले नाही.
गेल्या तीन-चार वर्षांपासून सुटीच्या दिवशीच नाही, तर अन्य दिवशीही तिकीट खिडकीसमोरील प्रचंड मोठय़ा रांगांमुळे प्रवासी हतबल झाले आहेत. मात्र यामागे प्रवाशांची वाढलेली संख्या, हे एकमेव कारण नसून अपुरे तिकीट बुकिंग क्लार्क हे महत्त्वाचे कारण आहे. बुकिंग क्लार्कच्या अभावामुळे मोठमोठय़ा स्थानकांवरही अनेक तिकीट खिडक्या बंद असतात. मध्य रेल्वेने तिकीट खिडकीला पर्याय म्हणून सुरू केलेली एटीव्हीएम मशिन्सही बहुतांश स्थानकांवर बंदच आहेत. त्याशिवाय जेटीबीएस ही संकल्पनाही अद्याप प्रवाशांत रूजलेली नाही. त्यामुळे तिकीट बुकिंग क्लार्कच्या अपुऱ्या संख्येमुळे प्रवाशांना अजूनही पाऊण-एक तास तिकिटाच्या रांगेत उभे राहावे लागत आहे. लांब पल्ल्यांच्या गाडय़ांमध्ये अनेकदा आरक्षित आसनांवर भलतेच प्रवासी बसल्याचे लक्षात येते. मग रिसतर तिकीट तपासनीसाला बोलावून त्या प्रवाशांना उठवण्याचे काम प्रवाशांना करावे लागते. मात्र सध्या तिकीट तपासनीसांची संख्या कमी असल्याने तिकीट तपासनीस या तक्रारींकडे काणाडोळा करत असल्याचे अनुभव प्रवाशांना आले आहेत. त्याशिवाय उपनगरीय रेल्वेमार्गावरील विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना रान मोकळे मिळत आहे.