सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविणे ही काँग्रेस पक्षाची परंपरा व संस्कृती आहे. पक्षाच्या वतीने गठित केलेल्या केंद्र-राज्य योजना सनियंत्रण समितीच्या ‘जनसेवक’ यांच्या माध्यमातून ही कामे पोहोचविण्याचे काम अगदी प्रभावीपणे राबविले जात आहे. विविध योजनांची लोकांना माहिती व्हावी यासाठी येत्या पंधरा दिवसांत ‘कॉल सेंटर’ काढण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी येथे केले.
   कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या केंद्र-राज्य योजना सनियंत्रण समितीच्या वतीने जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोजित केलेल्या जिल्हा जनसेवक पदाधिकारी यांच्या मेळाव्यात पाटील बोलत होते. ते म्हणाले, ही समिती स्थापन होण्याअगोदरच माझ्या मतदारसंघात कार्यकर्त्यांकडून विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून मतदारसंघातील सुमारे ५ हजार निराधार व गरीब महिलांना प्रत्येक महिन्याला शासनाच्या वतीने ४० लाख रुपये वाटप करण्याचे काम केले जात आहे. माझा आमदार ते मंत्रिपदापर्यंतचा प्रवास हा लोकांसाठी राबविलेल्या विविध योजनांमुळेच सुकर झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.  
     जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, माजी आमदार पी. एन. पाटील यांनी शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी राबविल्या जात असलेल्या सर्व योजना या काँग्रेस पक्षानेच सुरू केल्या असल्याचे सांगितले. पक्षाने केलेले काम आजूनही लोकांपर्यंत पोहोचत नसल्याची खंत व्यक्त करत या सनियंत्रण समितीच्या माध्यमातून हे काम व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.        
    केंद्र-राज्य योजना सनियंत्रण समितीचे प्रदेशाध्यक्ष विनायकराव देशमुख यांनी सोनिया गांधींच्या आदेशानुसारच या समितीचे काम चालणार असल्याचे सांगितले. राज्यात सुमारे २ लाख जनसेवकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगितले. पक्षाने राबविलेल्या या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठीच पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी या समितीची स्थापना केली असल्याचे सांगितले. त्यांच्या या निर्णयाला पािठबा म्हणूनच राज्यातून ५० लाख स्वाक्षऱ्यांची मोहीम राबविणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
   सनियंत्रण समितीचे मुख्य समन्वयक यशवंतराव हप्पे, अँड. सुरेश कुर्हाडे, जि. प. अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक, सरला पाटील, प्रकाश सातपुते, बसवराव पाटील, प्रीतम आठवले व किरण मेथे यांची भाषणे झाली. स्वागत चंदा बेलकर यांनी केले. जिल्हा अध्यक्ष मोहन पाटील यांनी प्रास्ताविक केले. यानंतर विविध योजनांच्या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.