कोणताही मोठा गुन्हा घडला की, प्रत्यक्ष गुन्हा करणारा गुन्हेगार आणि पडद्यामागचा सूत्रधार अशी चर्चा होते. दादर रेल्वे स्थानकात बऱ्याचदा सकाळी सकाळी तिकीट खिडक्यांवर पडदे असल्याचे चित्र दिसायचे. सकाळचे आठ वाजले की काही क्षणात पडदा बाजूला व्हायचा आणि प्रसन्न चेहऱ्याने बुकिंग क्लार्क प्रवाशांना सामोरे जायचे. या पडद्याचे गुपित बुधवारी उघड झाले. दोन तिकीट बुकिंग क्लार्क ‘पडद्यामागचा’ हा शब्द अक्षरश: खरा करत तिकीट खिडक्यांवर पडदे लावून तिकिटांचा काळाबाजार करत होते. पण हा प्रकार सुरू असतानाच दक्षता पथकाचा छापा पडला आणि ‘पडद्यामागची’ही कारस्थाने प्रवाशांच्या आणि रेल्वे प्रशासनासमोर उघड झाली. या दोघांकडूनही ‘तात्काळ’ मधील तीन आरक्षित तिकिटे आणि तिकिटांचे तीन अर्ज जप्त करण्यात आली आहेत.
गर्दीच्या हंगामात रेल्वेच्या तिकिटांच्या काळाबाजाराचा धंदा जोरात असतो, याबाबत ‘वृत्तान्त’नेच प्रकाश टाकला होता. रेल्वे अधिकारी, कर्मचारी आणि काही प्रमाणात रेल्वे सुरक्षा अधिकारी ही सारी मंडळी काळाबाजारात सामील असतात, असा संशयही प्रवाशांनी व्यक्त केला होता. विशेष म्हणजे ‘तात्काळ’मध्ये तिकीट आरक्षण करण्यासाठी रात्रभर रांग लावल्यानंतर तिकीट खिडकीवर पहिला क्रमांक असतानाही आरक्षित तिकीट मिळण्याऐवजी प्रतीक्षा यादीत नाव येण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. मात्र या प्रकारांमागे एक पडदा आहे, आणि या पडद्यामागे या प्रकारांना जबाबदार असणारे रेल्वेचे कर्मचारीच आहेत, ही गोष्ट या छाप्यामुळे उघडकीस आली.
दादर स्थानकात तात्काळ तिकिटांच्या आरक्षणासाठी रात्रभर रांग लावणाऱ्या प्रवाशांना तिकीट खिडकीवर पडदा टाकल्याचे पाहायला मिळत होते. सकाळी आठच्या सुमारास पडदा उघडला की, प्रसन्न वदनाने तात्काळ तिकीट देण्यासाठी सज्ज असणारे क्लार्कही दिसत होते. मात्र हाती तिकीट आल्यानंतर पहिला क्रमांक असूनही प्रतीक्षा यादीत नाव गेल्याचे आढळत होते. हा पडदा सकाळी पडलेला असतानाच दक्षता पथकाने छापा मारला असता, पडद्यामागील तिकीट क्लार्क आरक्षण सुरू होण्याआधीच काही तिकिटे आरक्षित करून ठेवत असल्याचे आढळले.दादर स्थानकातील बुकिंग क्लार्क आर. सी. मीणा आणि भोला दास या दोघांना ताब्यात घेण्यात आले. या कर्मचाऱ्यांकडे तीन आरक्षित तिकिटे आणि तीन तिकिटांसाठीचे अर्ज सापडले. विशेष म्हणजे या दोघांनी स्थानकातील चहावाल्याला तिकीट मिळवून देण्याच्या बोलीवर त्याच्याकडून महिनाभर फुकट चहा उकळल्याचेही चहावाल्याने सांगितले.
याबाबत मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता, तिकिटांच्या व्यवहारात पारदर्शकता असावी, यासाठी आम्ही काचेच्या खिडक्या तयार केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अशा प्रकारे खिडक्यांवर पडदे टाकून त्यामागे तिकिटांचा गैरव्यवहार होत असल्यास ही बाब गंभीर असल्याचेही ते म्हणाले. प्रवाशांनाही अशा प्रकारचा संशय आल्यास किंवा अशी गोष्ट आढळल्यास त्यांनी तातडीने तक्रार करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणातील संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.