राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे खंदे समर्थक आणि त्यांच्या आशिर्वादानेच मोठे झालेले आमदार विनायक मेटे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्दय़ावरून आज येथे शरद पवार यांनाच खडे बोल सुनावले. पवारांनी मागील निवडणुकीपूर्वी आरक्षणाचे आश्वासन देऊनही ते पाळले नसल्याची टीका करतानाच याबाबत आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.
शिवसंग्रामचे अध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार बैठकीत आमदार मेटे यांनी मराठा आरक्षण, शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन यावर सुरू असलेल्या लढय़ाची माहिती दिली. मेटे म्हणाले की, प्रचलित आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला २५ टक्के आरक्षण द्यावे, या साठी आपण २० वषार्ंपासून संघर्ष करीत आहोत. भाजप-शिवसेना युतीबरोबर राजकीय सख्य करतानाही हीच प्रमुख मागणी होती. युतीच्या सत्तेत काही मागण्या मान्य झाल्या. मात्र, आरक्षणाची मागणी सोडली नाही. पाच वर्षांपूर्वी शिवसंग्रामच्या माध्यमातून या मागणीसाठी आंदोलन अंतिम टप्प्यात असताना लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली. शरद पवार पंतप्रधान होतील, या आशेने सर्वानीच त्यांना पािठबा दिला. पवार यांनीही निवडणुकीनंतर मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिल्याने त्यांच्याबरोबर गेलो. मात्र, पवार यांनी आश्वासन पाळले नाही. सभागृहात सातत्याने प्रश्न उपस्थित केले, भांडलो. मात्र, सरकारची आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका दिसत नाही. नेमलेल्या आयोगांनीही पूर्वदूषित अहवाल सादर केला, असा आरोप करुन आता नेमलेल्या नारायण राणे समितीने वेळेत आपला अहवाल सादर करावा, अशी मागणीही मेटे यांनी केली.