अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणू व विषाणूंमध्ये प्रतिजैविकांचा (अ‍ॅंटिबायोटिक्स) प्रतिकार करण्याची क्षमता वाढल्याने मानवी आरोग्यच धोक्यात आले आहे. त्यामुळे या जीवाणूंचा नायनाट करणारी सक्षम औषधे निर्माण करण्याची गरज वैद्यकीय क्षेत्रात व्यक्त करण्यात येत आहे.
किरकोळ जखमेतून किंवा इतर मार्गाने होणारा जीवाणू व विषाणूचा संसर्ग पूर्वी थोडय़ाफार प्रतिजैविकांच्या माध्यमातून लवकरच दुरुस्त होत होता. परंतु आता मात्र किरकोळ आजार देखील जीवघेणे ठरू पाहात आहेत. पूर्वी अशा आजारातून बरे होण्याची शक्यता १०० टक्के होती. ती आता जागतिक पातळीवर ५० टक्क्क्यावर येऊन पोहोचली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे. या अहवालाची पुष्टी इंडियन मेडिकल असोसिएशनने सुद्धा केली असून यावर तेवढय़ाच ताकदीचे नवीन औषधे निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे, असे स्पष्ट मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मरतड पिल्लई यांनी नागपूर दौऱ्यात व्यक्त केले.
‘अँटी’ म्हणजे विरोधी आणि ‘बायो’ म्हणजे जीव. जीवाणूंना मारणारी किंवा त्यांच्या वाढीस प्रतिबंघ करणारी औषधे म्हणजे प्रतिजैविके (अँटीबायोटिक्स) होय. पेनिसिलीनचा वापर करून विविध रोगावरही औषधे तयार करण्यात आली. जंतूसंसर्ग रोखण्यासाठी या प्रतिजैविकांचा वापर केला जाऊ लागला. पण कालांतराने जंतूसंसर्गाला कारणीभूत ठरणाऱ्या एकपेशीय जिवांनी पेनिसिलीन विरोधात प्रतिकारक्षमता विकसित केली. त्यामुळे एकामागून एक नवी प्रतिजैविके विकसित करण्यात आली. त्यांना औषधांची पुढची पिढी म्हटली जाते. पुढच्या पिढीच्या प्रत्येक प्रतिजैविकाची क्षमता ही आधीच्या प्रतिजैविकापेक्षा अधिक होती. सध्या औषधांच्या चौथ्या पिढीतल्या प्रतिजैविकांचा वापर केला जातो. एखाद्या आजारावरच्या उपचारासाठी सतत एकाच प्रकारच्या औषधांचा वापर केल्यास त्या आजाराच्या जीवाणू किंवा विषाणूमध्ये त्या औषधांना प्रतिकार करणारी क्षमता विकसित होते. त्यामुळे हे जीवाणू या औषधांना दाद देत नाही.
सध्या स्वत:च्या मनाने दुकानात जाऊन औषधे खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रतिजैविके घेऊ नयेत.
सर्दी, खोकला, ताप यावर प्रतिजैविके घेणे टाळायला हवे. तसेच डॉक्टरांनीसुद्धा रुग्णांना योग्य ती औषधे लिहून द्यावीत. औषधांचा भडीमार करू नये, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

खासगी डॉक्टरांनी प्रतिजैविकांचा मारा करू नये- डॉ. पिल्लई
भारतातील ७० टक्के आरोग्य सेवेचा भार खासगी डॉक्टर वाहतात. त्यामुळे साहजिकच खासगी डॉक्टर औषधांचा मारा करतात, असा आरोप होत असावा. परंतु, प्रतिजैविकांचा वापर कसा करावा, हे जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निकषानुसार आयएमएने काही दिशानिर्देश तयार केले आहेत. त्यानुसारच प्रतिजैविके द्यावी अशा सूचना देशातील खासगी डॉक्टरांना देण्यात आलेल्या आहेत. परंतु काही डॉक्टर प्रतिजैविकांचा भडीमार करीत असेल तर ते चुकीचे आहे. सध्याच्या स्थितीत प्रतिजैविके कूचकामी ठरत आहे. ५० टक्के रुग्णांवर त्याचा लाभच होत नाही. तेव्हा जीवाणूंचा नायनाट करणारी किंवा प्रतिबंध घालणारी औषधे तयार करण्याची गरज असून त्यासाठी केंद्र सरकारनेच पुढाकार घ्यायला पाहिजे. दुसरीकडे औषध कंपन्या बेसुमार औषधांच्या चाचण्या करीत आहेत. त्यावरही सरकारने बंधणे घालणे आवश्यक असल्याचे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मरतड पिल्लई यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.