चित्र, शिल्प आणि हस्तकलांचे पारंपरिक आणि आधुनिक अविष्कार एकाच ठिकाणी पाहण्याचा योग उपवन आर्ट फेस्टिव्हलमध्ये जुळून आला आहे. त्यामुळे देशभरातील अभिजात संगीत प्रवाहांबरोबरच दृश्यकलांचे मनोहारी दर्शन हेही या महोत्सवाचे एक प्रमुख वैशिष्टय़ आहे. महोत्सवात त्यासाठी एक खास दालन उभारण्यात आले असून त्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रकारांच्या कलाकृती मांडण्यात येणार आहेत. सुधीर पटवर्धन, शर्मिला सामंत, सुनील गावडे, प्राजक्त पोतनीस, जीजी स्कारिया, एयान पर्कोको आदी नामवंत या महोत्सवात सहभागी होतील. तसेच मुख्य कला दालनात एकूण साठ ते सत्तर कलावंतांची कामे पाहता येतील, अशी माहिती दृश्यकला विभागाचे एक समन्वयक सुप्रसिद्ध चित्रकार सुधीर पटवर्धन यांनी दिली. कलादालनाबरोबरच महोत्सवात देशभरातून आलेले कलावंत आपापल्या कलांचे सादरीकरणही करणार आहेत. कॅलिग्रॅफी, ओरिगामी, ग्लास पेटींग आदी कलांचा त्यात समावेश आहे.
शुक्रवारी सकाळी १० ते १ यावेळेत तनुजा राणे प्रिंट मेकींग, बॉबी विजयकर ओरिगामीची कार्यशाळा घेणार आहेत. दुपारी १.३० ते ४.३० यावेळेत अमी ठक्कर पेपर क्विलिंगची तर संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट वारली चित्रकलेची कार्यशाळा घेतील. संध्याकाळच्या सत्रात पाच ते सात दरम्यान नेहा पुल्लरवार पॉटरी तर प्रभाकर भाटलेकर अर्कचित्रांची कार्यशाळा घेतील.
खाद्ययात्रा
वैशिष्टय़पूर्ण खाद्यपदार्थ हे त्या त्या संस्कृतीचे अविभाज्य घटक असतात. ठाण्यात भरणाऱ्या या आजवरच्या सर्वात मोठय़ा कला महोत्सवातही त्यासाठी खास जागा राखीव असून त्यात देश-विदेशातील लज्जतदार पदार्थाचा समावेश असेल. भारतातील विविध प्रांतातील खास जिन्नस त्यात असतीलच, शिवाय  इटालियन, चायनीज, कॉन्टिनेन्टल आदी विविध ३० स्टॉल्स महोत्सवात असणार आहेत.वॉल इज ए स्क्रिन
‘वॉल इज ए स्क्रिन’ हे या महोत्सवाचे एक प्रमुख आकर्षण असेल. त्यात जर्मन चित्रपटतज्ज्ञ दृश्यकलेचा एक नाविन्यपूर्ण प्रकार सादर करणार आहेत. या प्रकारात रात्री निर्मनुष्य रस्त्यांवर एखाद्या इमारतीच्या पांढऱ्या भिंतीवर सिने शौकिनांसाठी त्यांच्या आवडीचे लघुपट दाखविले जाणार आहेत.