काँग्रेस आघाडी सरकारमुळे अंबानी बंधूंच्या संपत्तीत कोटय़वधींची वाढ झाली. उद्योगपती मोठे झाले. नेते, पुढारी गबर झाले. त्यामुळे काँग्रेसमुक्त देश व आघाडीमुक्त महाराष्ट्रासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संघटित व्हावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शहरात आयोजित जेल भरो आंदोलनापूर्वी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार पंकजा पालवे, भाजप सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, खासदार रावसाहेब दानवे, हरिभाऊ बागडे, उपमहापौर संजय जोशी, गोविंद केंद्रे, श्रीकांत जोशी आदी उपस्थित होते. आंदोलनात अनेक कार्यकर्त्यांनी अटक करवून घेतली. हे सरकार घोटाळ्यांचे आहे, असा आरोप करून फडणवीस म्हणाले की, टेलिफोनचा १ लाख ६५ हजार कोटींचा घोटाळा झाला. त्या मंत्र्यांना अटक झाली. पी. चिदम्बरम व पंतप्रधान कार्यालयाने फारसे काही केले नाही. चुकीचे स्पेक्ट्रम वाटल्यानंतर मंजूर केलेली संचिका मी पाहिली, एवढाच अभिप्राय पंतप्रधानांनी दिला. कोळसा घोटाळ्याचेही असेच झाले. कोळसा घोटाळ्यात राज्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी नीट चौकशीची गरज आहे. घोटाळ्यांचे आकडे एवढे मोठे आहेत की, तो आकडा विद्यार्थ्यांना लिहायचा असेल तर वही भरून जाईल. जशी अवस्था केंद्रात, तशी राज्यातही असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे सिंचन घोटाळा झाला. ते दुष्काळात मदत तर करू शकले नाहीत, उलट त्यांचे वक्तव्य लाज काढणारे होते, अशी टीका त्यांनी केली.
आमदार पालवे यांनी दुष्काळग्रस्त भागाकडे सरकारने कसे दुर्लक्ष केले, याची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, या पुढे भाजप कार्यकर्त्यांनी ‘गोपीनाथ मुंडे तुम संघर्ष करो,’ हे घोषवाक्य बदलून ‘गोपीनाथ मुंडे तुम सत्ता लो, हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणा द्यायला शिकावे. राष्ट्रवादीच्या नव्या संघटनात्मक बदलांवरही त्यांनी टीका केली. ‘चोर गेले आणि दरोडेखोर आले’ अशी म्हणण्याची वेळ आल्याचा टोला त्यांनी लगावला. खासदार दानवे, ठाकूर, बागडे यांची भाषणे झाली.