चेंबूर
मुंबईतला चेंबूर मतदारसंघ हा एकेकाळी भाजपचा प्रमुख गड होता. सिंधी वस्ती असलेल्या मतदारसंघात हशू अडवाणी यांनी भाजपचा हा गड राखून ठेवला होता. गेल्या दहा वर्षांत काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरे यांनी तो आपल्याकडे खेचून आणला. सिद्धार्थ कॉलनी, लाल डोंगर, माहूल नगर, छेडा नगर इथपासून वडाळ्याकडील भक्ती पार्कपर्यंत हा परिसर पसरलेला आहे. या मतदारसंघात ८० टक्के मध्यवर्गीय मतदार आहेत. त्यातील ६० टक्के आंबेडकरी जनता आहे. एचपीसीएल, बीपीसीएल, आरसीएफ आदी कंपन्यांचा विळखा असल्याने प्रदूषणाची मोठी समस्या आहे. विकास आराखडय़ातील आरक्षण, झोपडपट्टय़ा पुनर्विकास ही या मतदारसंघातील जटील प्रश्न आहेत. त्यामुळे प्रत्येक उमेदवारांनी प्रदूषण, झोपडपट्टय़ा आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या मूलभूत समस्यांवर भर दिलेला आहे. विद्यमान आमदार चंद्रकांत हांडोरे यांच्या पत्नी काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. २ लाख ६८ हजार मतदार या मतदारसंघात आहेत. यावेळी पंचरंगी लढत असल्याने जिंकून येण्यासाठी २५ हजार मतांची आवश्यकत आहे. ६० टक्के आंबेडकरी जनतेवर साऱ्या उमेदवारांची भिस्त आहे. या मतदारसंघात एकूण सहा नगरसेवक असून चार काँग्रेसचे आणि दोन भाजपचे आहेत.
’ या मतदारसंघातही एकूण १० उमेदवार रिंगणात आहे. प्रमुख लढत कॉंग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रवादी आणि मनसे या पक्षांमध्ये आहे. भाजपने या जागेवर दावा सांगितला होता. पण रामदास आठवले भाजपसोबत गेल्याने रिपाईच्या दीपक निकाळजे यांच्यासाठी ही जागा सोडण्यात आली. तर ऐनवेळी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची आघाडी तुटल्याने राष्ट्रवादीच्या रवींद्र पवार यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे. रवींद्र पवार राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते असून गेली २५ वर्षे नगरसेवक होते. तर शिवसेनेचे प्रकाश फातर्फेकरसुद्धा माजी नगरसेवक आहेत. आंबेडकरी मतांचे विभाजन चंद्रकांत हांडोरे आणि दीपक निकाळजे यांच्यात होण्याची शक्यता आहे. भाजपने रिपाईला साथ दिली तर निकाळजे यांच्यासाठी ते फायदेशीर ठरणार आहे. मागील निवडणुकीत निकाळजे यांना २० हजारांहून अधिक मते मिळालेली होती.
मोनो रेल, एक्सप्रेस फ्री वे, सांताक्रुझ चेंबूर जोडरस्ता आदींच्या कामामुळे चेंबूरला मुंबईच्या मध्यवर्ती भागात आणून ठेवले आहे. मेट्रो २ च्या कामातील अडथळा दूर केल्यानंतर तो मार्ग पनवेलपर्यंत जाणार आहे. शासनाने २००० पर्यंतच्या झोपडय़ा अधिकृत केल्या आणि नवीन झोपडपट्टी विकास धोरण आणले. त्यामुळे झोपडपट्टयांच्या पुनर्विकासाचा प्रश्न मिटला असून प्रत्येक झोपडपट्टी धारकांना स्वतचे घर मिळू शकणार आहे. छेडा नगरच्या सिंधी वसाहतींवरील हेरिटेजचा टॅग काढण्यात यश मिळवले. सगळे स्वतंत्र लढत असल्यामुळे मतविभागणीचा धोका वाटत नाही.
चंद्रकांत हांडोरे , विद्यमान आमदार.
सत्तेत असलेल्या आमदाराने मतदारसंघाचा विकास केला नाही. डम्पिंगचा प्रश्न, शाळांचा प्रश्न आणि प्रदूषणाची समस्या कायम आहे. ती सोडविण्यावर भर असेल. भाजप सोबत असल्याने त्याचा फायदा होऊ शकेल. विद्यमान आमदार गेल्या १२ वर्षांत आंबेडकर भवन बांधू शकले नाही, त्याचा रोष लोकांमध्ये आहे. गेली अनेक वर्ष सतत लोकामंध्ये काम करत असल्याने चांगला जनसंपर्क आहे आणि तिच जमेची बाजू आहे.
दीपक निकाळजे, रिपब्लिक पक्ष
उमेदवार
काँग्रेस – चंद्रकांत हांडोरे ल्ल  शिक्षण- इंटर आर्ट सायन्स, *  मालमत्ता, स्थावर- ७८ लाख ७४ हजार ५०० जंगम  – २६ लाख ३४ हजार ४५३
रिपब्लिकन पक्ष – दीपक निकाळजे, ल्ल शिक्षण – दहावी *  मालमत्ता – स्थावर – ८ कोटी ५५ लाख, जंगम – ४ कोटी ६९ लाख ७३ हजार
राष्ट्रवादी कॉंग्रेस – रवींद्र पवार  ल्ल  शिक्षण – बी.ए. *  मालमत्ता- स्थावर – ७८ लाख २० हजार,  जंगम – २६ लाख ९ हजार
शिवसेना – प्रकाश फातर्फेकर ल्ल   शिक्षण – १० वी     * मालमत्ता, स्थावर –   १ कोटी ५५ लाख, जंगम – ७० लाख ४९ हजार
मनसे – सारिका धडानी ल्ल शिक्षण -एसवायबीकॉम *  मालमत्ता, स्थावर –           ७० लाख, जंगम – ३३ लाख ५२ हजार २१२