20 September 2020

News Flash

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदार, उमेदवारांमध्ये उत्साह

तुमच्याकडे किती मते आहेत.. त्यांची येण्या-जाण्याची व्यवस्था आम्ही करतो.. तुम्ही केवळ आकडा बोला.. अशी दबक्या आवाजात सुरू असलेली चाचपणी.

| April 23, 2015 12:41 pm

तुमच्याकडे किती मते आहेत.. त्यांची येण्या-जाण्याची व्यवस्था आम्ही करतो.. तुम्ही केवळ आकडा बोला.. अशी दबक्या आवाजात सुरू असलेली चाचपणी. उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी केंद्रांवर झालेली गर्दी.. काही ठिकाणी झालेले वादविवाद तर काही ठिकाणी मतदार यंत्रात झालेला बिघाड.. अशा वातावरणात बुधवारी जिल्ह्यातील ५०२ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया काही किरकोळ अपवादवगळता शांततेत पार पडली. टळटळीत उन्हाचा मतदान प्रक्रियेवर विपरीत परिणाम झाल्याची भावना काही उमेदवारांनी व्यक्त केली. दुपापर्यंत ४३ टक्के मतदान झाले होते. अखेरच्या वेळेपर्यंत हक्काचे मतदान करवून घेण्यासाठी उमेदवारांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते.
जिल्ह्यातील ४८४ ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया झाली. त्यात १५ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचाही समावेश आहे. १०३ ग्रामपंचायतींची निवडणूक आधीच अविरोध झाली आहे. नाशिकच्या तापमानाने सध्या ४० अंशांचा टप्पा गाठला आहे. टळटळीत उन्हात मतदान करणे अवघड होईल याचा अंदाज असल्याने मतदार सकाळपासून केंद्राकडे जाऊ लागले. यामुळे सकाळच्या सत्रात अनेक मतदान केंद्रांवर गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले. गावाकडील अनेक जण शहरात उदरनिर्वाहासाठी आले आहेत. त्यांच्या नावाची नोंद मतदार यादीत कायम आहे. अशा मतदारांना शोधण्यात उमेदवारांच्या समर्थकांनी कोणतीही कसर सोडली नाही. जादा सदस्य असल्यास येण्या-जाण्याची व्यवस्था करण्याची तयारी दर्शविली गेली.
गावातील आपले हक्काचे मतदान करवून घेण्यासाठी सर्व पर्याय खुले ठेवले गेले. मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी चारचाकी वाहनांची खास व्यवस्था करण्यात आल्याचे पाहावयास मिळाले. घरातील मतदारसंख्या पाहून वाहन कोणते पाठवायचे याचे संदेश कार्यकर्त्यांकडून दिले जात होते. इतकेच नव्हे तर, मतदानाला आलेल्यांची बडदास्त नाश्ता, काही ठिकाणी भोजनाच्या व्यवस्थेसह ठेवण्यात आली. काही मतदारांनी या सुविधा अव्हेरत ‘पैशात बोला’चा सूर आळवला. अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी ‘लक्ष्मीदर्शन’ घडल्याचे सांगितले गेले. या निवडणुकीच्या निमित्ताने काही मतदारांनी टंचाईची समस्या तात्पुरती सोडवून घेण्याकडे लक्ष केंद्रित केले. टंचाईसदृश गावात विहिरीत टँकरने पाणी आणून टाकणाऱ्याच्या पाठीमागे उभे राहण्याचे आश्वासन मतदारांनी दिले.
मतदानाच्या दिवशी दिवसभर अशा अनेक घडामोडी घडत असल्या तरी या संदर्भात काही तक्रारी आल्या नसल्याचे निवडणूक यंत्रणेकडून सांगण्यात आले. भरारी पथकांच्या या घडामोडी दृष्टिपथास पडल्या नाहीत. एक हजार ६५४ मतदान केंद्रांवर या निवडणुकीसाठी मतदान झाले. प्रत्येक केंद्रावर पाच या प्रमाणे जवळपास नऊ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर मतदानाची जबाबदारी सोपविण्यात आली. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता.
मतदानावेळी काही केंद्रांवर उमेदवारांनी काही मुद्यांवर आक्षेपही घेतले. काही कारणावरून किरकोळ वादही उद्भवले. दुपारच्या वेळी मतदान प्रक्रिया संथपणे सुरू होती. उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर मतदार घराबाहेर पडू लागल्याचे पहावयास मिळाले. दुपापर्यंत जिल्ह्यात ४३ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक शाखेच्या मधुमती सरदेसाई यांनी सांगितले.
जिल्ह्यातील निफाड, मालेगाव, सिन्नर, बागलाण, चांदवड, नांदगाव, दिंडोरी, देवळा येथील १०४ ग्रामपंचायती संवेदनशील असल्याने त्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
दोन अप्पर अधीक्षक, आठ उप अधीक्षक, ४३ पोलीस निरीक्षक, १३५ साहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक, २२६५ पोलीस कर्मचारी असा एकुण बंदोबस्त होता. या शिवाय राज्य राखीव दलाची तुकडी, गृहरक्षक दलाचे १४५० जवान, ३०० पोलीस कर्मचारी, दोन उपअधीक्षक, दोन पोलीस निरीक्षक  असा अतिरिक्त फौजफाटा संवेदनशील केंद्रावर ठेवण्यात आला.

निशाणी बदलल्याने बहिष्कार
प्रत्यक्ष मतदानावेळी एका उमेदवाराची निशाणी बदलली गेल्याची घटना येवला तालुक्यातील विसापूर गावात घडली. हार्मोनिअमच्या पेटीऐवजी लोखंडी पेटी निशाणी म्हणून आल्याने मतदारांमध्ये गोंधळ उडाला. निवडणूक यंत्रणेच्या कारभाराचा ग्रामस्थांनी निषेध करत तीन तास मतदानावर बहिष्कार टाकला. निवडणूक अधिकाऱ्यांनी गावात धाव घेऊन ग्रामस्थांची समजूत काढली. मूळ निशाणीचे चिन्ह टाकल्यानंतर मतदानाला सुरुवात झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2015 12:41 pm

Web Title: voters candidates in enthusiasm for panchayat elections
Next Stories
1 रंगालय नाटय़ चळवळीतर्फे ‘कृष्णविवर’चा प्रयोग
2 सिन्नरची तहान भागविण्यासाठी नदीजोड प्रकल्पास हिरवा कंदील
3 भुजबळ ठरवतील तोच जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष
Just Now!
X