पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर किणी व तासवडे या टोल नाक्यांच्या ठिकाणी वाहतूकदारांची लुबाडणूक केली जाते. त्यांना मारहाण, दादागिरी असा प्रकारही केला जातो. प्रत्यक्षात जाणाऱ्या वाहनांपेक्षा टोल वसूल केली जाणारी वाहने संख्येने कमी आहेत. हा भ्रष्ट व्यवहार थांबण्याबरोबरच टोलवसुली रद्द व्हावी, याकरिता आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर, बस महासंघाचे नेते प्रकाश गवळी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
किणी व तासवडे या दोन टोल नाक्यांच्या ठिकाणी वाहनचालकांना कशा प्रकारे त्रास दिला जातो याची सविस्तर माहिती महासंघाच्या वतीने घेण्यात आली. त्याचा तपशील देताना गवळी म्हणाले, आम्ही केलेल्या पाहणीमध्ये टोल नाक्यांच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार चालत असल्याचे आणि तेथील कर्मचाऱ्यांकडून अरेरावी होत असल्याचे दिसून आले आहे. एका आठवडय़ात या दोन नाक्यांच्या ठिकाणापासून सुमारे ४० हजार वाहने जातात. प्रत्यक्षात २२ हजार वाहनांकडूनच टोलची रक्कम आकारण्यात आली आहे. उर्वरित वाहनचालकांकडून निम्मे पैसे घेऊन, चिरीमिरीचा व्यवहार करून वाहने सोडली जातात. त्यांच्याकडून रीतसर पावत्या करण्याचे काम केले जात नाही. यामध्ये करोडो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होत आहे. यातून टोल आकारणी करणारी कंपनी व तिचे कर्मचारी शासनाची दिशाभूल करतात हे उघडकीस आले आहे.
किणी व तासवडे हे दोन्ही टोल नाके वाहनधारकांना त्रास देण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत, असे सांगून गवळी म्हणाले, या दोन्ही ठिकाणी किरकोळ कारणावरून वाहनचालक व आतील प्रवाशांना बेदम मारहाण करण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. तेथील कर्मचाऱ्यांकडून अनेक वाहनचालकांना दादागिरीचा कटू अनुभव आला आहे. लोकप्रतिनिधीसुद्धा या वाईट अनुभवातून गेले आहेत. परिणामी जमावाने अनेकदा या टोल नाक्यांवर हल्ला चढवला आहे. तरीही तेथील प्रशासन व कर्मचाऱ्यांकडून कसलीही सुधारणा झालेली नाही. हा सर्व गैरव्यवहार रस्ते विकास महामंडळ व कोनार्क इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याकडून संगनमताने होत आहे.
या सर्व गैरव्यवहाराची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे. किणी व तासवडे या टोल नाक्यांवरील टोलच रद्द करावा, अशी महासंघाची मागणी आहे. त्याकरिता भोपाळ येथे होणाऱ्या वाहतूकदारांच्या राष्ट्रीय सभेमध्ये ही मागणी केली जाणार आहे. या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास वाहतूकदार तीव्र आंदोलन करणार आहेत, असेही गवळी यांनी सांगितले.