उन्हाळ्याची तीव्रता अजून कायम असताना पाणीटंचाईची तीव्रता मात्र दिवसागणिक वाढतेच आहे. मराठवाडा विभागात पाण्याची टंचाई असलेल्या १ हजार ८१० गावे व ८९६ वाडय़ांना २ हजार ३१८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विभागात ४ हजार ८०९ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.
औरंगाबाद जिल्ह्य़ातील ५३६ गावे, २६ वाडय़ांना ७०३ टँकर, जालना ४३९ गावे, १११ वाडय़ांना ५५५, परभणी २१ गावे, ४ वाडय़ांना २६ टँकर, नांदेड ९९ गावे, ६० वाडय़ांना १९१ टँकर, बीड ५०६, ६५९ वाडय़ांना ५६८ टँकर, उस्मानाबाद १७८ गावे, ३३ वाडय़ांना २४३ टँकर, लातूर १७ गावे, २ वाडय़ांना १९ टँकर व हिंगोली जिल्ह्य़ातील १४ गावे, एका वाडीला १३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती यंत्रणेकडून देण्यात आली.
२९४ चारा छावण्या
टंचाई स्थितीच्या पाश्र्वभूमीवर विभागात २९४ चारा छावण्या सुरू आहेत. या छावण्यांतील जनावरांची संख्या २ लाख ३६ हजार ४५८ आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ातील १०४ छावण्यांमध्ये ५१ हजार ९७७ जनावरे, जालना ७९ छावण्यांमध्ये ४५ हजार ८९३, बीड ८२ छावण्यांमध्ये १ लाख १५ हजार ६४३, परभणी एका छावणीत ३५२ व उस्मानाबाद जिल्ह्य़ातील २८ छावण्यांमध्ये २२ हजार ५९३ जनावरांचा समावेश आहे.