तीव्र पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलपुनर्भरण ही काळाची गरज आहे, असे मत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस. बी. लांगोरे यांनी व्यक्त केले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व ग्रामविकास संस्थेतर्फे मागास क्षेत्र अनुदान निधी योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. ग्रामविकास सचिव नरहरी शिवपुरे, बी.आर.जी.एफ. जिल्हा समन्वयक एल. के. गांगे, सहायक प्रकल्प संचालक पी. आर. मनचंदा उपस्थित होते. शिवपुरे म्हणाले, की जलपुनर्भरणामुळे पाणीटंचाईवर मात व नैसर्गिक साधनांचा ऱ्हास टाळण्यास मदत होईल.
राज्यातील सर्व धरणांच्या साइट संपल्या असून या पुढील काळात साइटअभावी धरणे बांधणे शक्य होणार नाही. सार्वजनिक व वैयक्तिक जलपुनर्भरण, शेततळी, वनराई बंधारे, तलावातील गाळ काढणे, सार्वजनिक इमारतीचे जलसंचय करून पुनर्भरण केल्यास काही प्रमाणात तीव्र टंचाईवर मात करणे शक्य असून, यासाठी नैसर्गिक संसाधन साक्षरता वाढविण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन सुवर्णा मोहिते यांनी केले.