निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी आज दुपारी १७०० क्युसेक्सने प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. निळवंडे, भंडारदरा धरणात  सध्या शिल्लक असणाऱ्या ३ टीएमसी पाण्यापैकी १ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडले जाणार असल्याचे  समजते.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नगर, नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील पुरेसे पाणी जायकवाडीसाठी ४८ तासात सोडण्याचा आदेश दिला होता. त्याप्रमाणे काल (दि. २७) रात्री भंडारदरा धरणातून ७६० क्युसेक्सने वीजनिर्मिती केंद्राद्वारे पाणी सोडण्यास सुरूवात झाली. हे पाणी निळवंडे धरणात जमा होत आहे. निळवंडे धरणातून आज दुपारी बारा वाजता १७०० क्युसेक्सने प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले.
निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याची ही तिसरी वेळ. गतवर्षी २१ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत निळवंडे, भंडारदरा धरणातून अडीच टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात आले होते. त्यानंतर २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत तीन टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडले गेले. त्यावेळेला पाणी सोडण्यासाठी भंडारदऱ्याच्या स्पीलवेचा वापर करण्यात आला. त्यामुळे भंडारदऱ्यातून ५ हजार क्युसेक्सपेक्षा अधिक वेगाने पाणी सोडणे शक्य झाले. हे पाणी निळवंडे धरणात येऊन धरणाच्या िभतीवरुन प्रवरा नदीपात्रात पडत होते.
आता भंडारदरा धरणातील पाणीपातळी खूपच कमी झाल्यामुळे स्पीलवेतून पाणी सोडता येणे शक्य नाही. त्यामुळे मागील वेळेप्रमाणे निळवंडे धरणाच्या सांडव्यावरुन पाणी बाहेर काढता येणे शक्य नाही. निळवंडे धरणाच्या िभतीत असणाऱ्या एकमेव विमोचकातूनच पाणी सोडण्याची सुविधा आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडण्यास मर्यादा आल्या असून आज सोडले यापेक्षा अधिक वेगाने पाणी सोडता येणे शक्य नाही. त्यातच कोरडे पडलेले नदीपात्र, वातावरणातील प्रचंड उष्णता, नदीपात्रात जागोजागी वाळूसाठी करण्यात आलेले खड्डे यामुळे नदीपात्रात पाणी मोठय़ाप्रमाणात जिरण्याची शक्यता आहे.
पाणी जायकवाडीला कधी पोहचेल हे नदीकाठच्या गावांचा वीजपुरवठा किती तास खंडीत ठेवला जाईल यावर अवलंबून आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या भंडारदऱ्याच्या लघूआवर्तनात वीज पुरवठा २१ तास बंद ठेवण्यात आला होता. तेव्हा भंडारदऱ्यातून सोडलेले पाणी ओझर बंधाऱ्यापर्यंत पोहचण्यासाठी ४० तास लागले होते. यावेळेला त्या पाण्याचा प्रवाह त्यापेक्षाही अधिक दूरवपर्यंत होणार आहे. त्यामुळे सोडलेल्या पाण्यातील किती पाणी नक्की जायकवाडीपर्यंत पोहचेल याबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.