निम्नतेरणा (जिल्हा उस्मानाबाद) धरणातील पाण्याचा औसा शहराला पुरवठा करण्यासाठी आमदार बसवराज पाटील यांच्या प्रयत्नातून जवळपास ३६ कोटी रुपयांच्या योजनेला राज्य सरकारने मंजुरी दिली असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मिटकरी यांनी दिली.
निम्नतेरणा प्रकल्पातून स्वतंत्र जलवाहिनीतून औसा शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा, शहर वाढीव योजनेतून या प्रकल्पातील पाण्यासाठी आरक्षण व वाढीव पाणीपुरवठा करण्यास निधीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. नगराध्यक्ष मिटकरी यांनी शहराला नित्य भेडसावणाऱ्या प्रश्नी गेल्या ऑगस्टमध्ये राज्य सरकारकडे नव्याने प्रस्ताव सादर केला. या वाढीव योजनेला सरकारने मान्यता देऊन निधीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला. आमदार पाटील यांनी शहराच्या पाणीप्रश्नी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्याशी चर्चा केली. अखेर सरकारने नुकतेच (१८ नोव्हेंबर) माकणी निम्नतेरणा धरणातून २.८३ दशलक्ष घनमीटर जवळपास ३६ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या योजनेस आरक्षणातून मंजुरी देत संबंधित विभागांना आदेश दिले. औसेकऱ्यांचा गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला पाणीप्रश्न मिटला असल्याची माहिती नगराध्यक्ष मिटकरी यांनी दिली.
औसा शहरातील मत्स्यव्यवसाय कामास अडीच कोटी, तलावसंवर्धनासाठी साडेतीन कोटींचा निधी मंजूर झाल्याचेही मिटकरी यांनी सांगितले. तालुकाध्यक्ष शेषेराव पाटील, शहराध्यक्ष महंमद हानीफ, राष्ट्रवादी गटनेते अफसर शेख, मुक्तार कुरेशी आदी उपस्थित होते.