डोंबिवली पश्चिमेतील २४ वादग्रस्त अनधिकृत इमारतींना भूमाफियांनी महापालिकेच्या जलवाहिनीतून अनधिकृत नळजोडण्या घेऊन पाणीपुरवठा केल्याचे प्रकरण उघडकीस येऊ लागले आहे. यामधील चार भूमाफियांनी सुमारे २६ हजार ८८६ घनमीटर पाण्याचा चोरून वापर केला. यासंबंधी महापालिकेचे १ लाख ७८ हजार रुपयांचे नुकसान झाले असून याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

० चार भूमाफियांवर गुन्हे दाखल
० २७ हजार घनमीटर पाणी चोरी
० पालिकेचे पावणे दोन लाखांचे आर्थिक नुकसान

अशोक लक्ष्मण भोईर या विकासकाने टेल्कोस वाडीमध्ये मंगेश निवास नावाची चार माळ्यांची अनधिकृत इमारत उभारली आहे. या इमारतीत २२ रहिवासी राहतात. या बांधकामाला चोरीने नळजोडणी घेऊन ८ हजार ८१० घनमीटर बेकायदा पाणी वापरले गेले. यामुळे महापालिकेचे ५७ हजार २६५ रुपयांचे देयकापोटी नुकसान झाले आहे. अरुण जोशी या विकासकाने वीर जिजामाता रोडवर अरुण जोशी नावाची दोन माळ्यांची अनधिकृत उभारली आहे. या इमारतीला चोरीच्या नळजोडणीतून ५ हजार ७३६ घनमीटर पाणी वापरण्यात आले. महापालिकेचे ३७ हजारांचे नुकसान केले आहे. या इमारतीत १७ रहिवासी राहतात. टेल्कोस वाडीतील विनोद सुखदेव भोईर यांनी अरुणोदय ही तीन माळ्यांची अनधिकृत इमारत उभारून त्याला चोरून घेतलेल्या नळजोडणीतून १० हजार ३३६ घनमीटर पाणी वापरले. यामुळे महापालिकेचे ६७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या इमारतीत ३० रहिवासी राहतात. देवीचा पाडा येथे बंडू म्हात्रे यांनी अनधिकृत चाळी बांधून त्याला २ हजार घनमीटर पाणी वापरून पालिकेचे १७ हजार रुपयांचे पाणी नुकसान केले आहे. या चार जणांविरुद्ध पालिकेचे उपअभियंता अनिरुद्ध सराफ यांनी पाणी चोरी केल्याबद्दल गुन्हे दाखल केले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.