रेल्वेच्या द्वितीय अथवा प्रथम वर्गाच्या दरात हवाई प्रवास करायचा असेल तर विमान तिकिटांचा सेल लागलाय. या सेलचा गुरुवार शेवटचा दिवस असून १५ एप्रिलपर्यंतच्या विमान तिकिटांवर घसघशीत ३० ते ५० टक्के सवलत विमान कंपन्यांनी देऊ केली आहे. देशांतर्गत प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही काही हवाई कंपन्यांनी आपल्या विमानांच्या भाडय़ात घसघशीत सूट देण्यास सुरुवात केली आहे. ही सूट दोन ते तीन दिवसांसाठीच असली, तरी या दिवसांमध्ये पुढील तीन महिन्यांपर्यंतची तिकिटे अत्यंत स्वस्त दरांत आरक्षित करता येणार आहेत. मात्र स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन महत्त्वाच्या कंपन्यांनी हा निर्णय घेतल्यानंतर लगेचच जेट एअरवेज, एअर इंडिया अशा जून्या मातबर कंपन्यांसमोर आव्हान उभे राहिले आहे. एअर इंडियानेही मंगळवारी रात्री उशीरा आपणही भाडेदरांत सूट देत असल्याची घोषणा केली. देशांतर्गत प्रवाशांसाठी हवाई कंपन्या दर वर्षी ठरावीक काळात काही दिवसांसाठी सूट देतात. ही सूट ३० ते ५० टक्के एवढी घसघशीत असते. पुढील तीन महिन्यांच्या देशांतर्गत विमान प्रवासासाठी ही सूट देत असल्याने अनेक प्रवासी याचा लाभ घेतात. गेल्या वर्षी या हवाई कंपन्यांनी दिलेली सूट पूर्ण वर्षभरासाठीच्या तिकीट आरक्षणांसाठी लागू होती. मात्र यंदा फक्त ३० ते ६० दिवसांपर्यंतच्या प्रवासासाठीच ही सूट लागू आहे.
स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन बडय़ा कंपन्यांनी मंगळवारी आपला वर्षांतील मोठा सेल जाहीर केला. २३ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत जे प्रवासी १५ एप्रिल २०१४ या तारखेपर्यंतच्या प्रवासाचे आरक्षण करतील, त्यांना स्पाइस जेटने तब्बल ५० टक्के एवढी घसघशीत सूट देऊ केली आहे. एवढीच सूट इंडिगोनेही आपल्या तिकिटांवर दिली आहे. एअर इंडियानेही मंगळवारी रात्री उशिरा आपणही यात मागे नसल्याचे दाखवत सूट देऊ केली आहे.
विमान प्रवास आणि त्याचे दर
विमान प्रवास       नेहमीचे दर   सवलतीचं दर
मुंबई-दिल्ली             ५८००     २८३०
दिल्ली-गोवा             ७४७५     ३३५५
बेंगळुरू-दिल्ली          ७३४०     ३४४४
मुंबई-बेंगळुरू            ४१५०     १९०२
चंदिगढ-मुंबई            ५२३०     २५८८
चेन्नई-दिल्ली           ६४५०     ३२९३
कोलकाता-मुंबई        ६३००     ३०९०