* शिवसेना पदाधिकाऱ्यांचा औरंगाबादेत मेळावा
दुष्काळग्रस्त भागाला केंद्र सरकारने दिलेला निधी म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार आहे. केंद्र सरकारकडून दिलेल्या निधीतून एकाही गावातील पाणीटंचाई दूर होणार नाही. मुख्यमंत्र्यांना पाणी कोठून आणायचे, हा प्रश्न पडला आहे. त्यांना ते दिसत नसेल तर मराठवाडय़ाच्या हक्काचे पाणी त्यांना दाखवून देऊ, असे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमदार सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.
संत तुकाराम नाटय़गृहात बुधवारी आयोजित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. सेनेचे खासदार अनिल देसाई, संपर्कनेते विश्वनाथ नेरूरकर, अर्जुन खोतकर, लक्ष्मण वडले, रवींद्र मिर्लेकर, माजी महापौर विशाखा राऊत, मीना कांबळे, जयप्रकाश मुंदडा, खासदार गणेश दुधगावकर, आमदार प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी, ओम राजेनिंबाळकर, ज्ञानराज चौगुले आदींची उपस्थिती होती. खासदार देसाई म्हणाले, की नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ व औरंगाबादचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात हे कसले पालक? पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी अडवणुकीचे धोरण स्वीकारले. यापुढे मराठवाडय़ात पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाणी कोठून आणायचे, हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना पडला आहे. त्यांना पाणी दिसत नसेल तर ते आम्ही दाखवू. केवळ सरकारवर टीका करायची असे नाहीतर जालन्याच्या मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना काही चांगले उपक्रमही हाती घेणार आहे. जलसंधारणाची कामे हाती घ्यावी लागतील. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी या अनुषंगाने मोठे काम केले होते.
दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी छोटय़ा बंधाऱ्यांची व जलसंधारणाच्या कामांची गरज आहे. दुष्काळग्रस्तांसाठी तुटपुंजा निधी मिळत असल्याने उपाययोजना करण्यासाठी सरकारच बदलायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले म्हणाले, की मराठवाडय़ाची गत दोर कापलेल्या सैन्यासारखी झाली आहे. तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यानंतर लढा किंवा मरा असेच सांगण्यात आले होते. मराठवाडय़ाची स्थितीही तशीच आहे. त्यामुळे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यासाठी मोठय़ा संख्येने जालन्याच्या मेळाव्याला उपस्थित राहण्याची गरज आहे.