दहावीच्या विद्यार्थ्यांचा सळसळता उत्साह, विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अपुरे पडलेले सभागृह, प्रवेशासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा, विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता लागलेल्या पालकांनीही आर्वजून लावलेली हजेरी, शैक्षणिक तज्ज्ञांचे लाभलेले मार्गदर्शन आणि आयुष्यात आता काही तरी करून दाखविण्याची विद्यार्थ्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती अशा वातावरणात ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या दहावीनंतर काय? या शैक्षणिक उपक्रमाचा बुधवारी वाशी येथील भावे नाटय़गृहात शुभारंभ झाला. मार्गदर्शन शिबिरांबरोबरच १५ एप्रिलपासून या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ‘लोकसत्ता’चा अंक दररोज वाचायचाच अशी खूणगाठ मनाशी बाळगून विद्यार्थ्यांनी चार तासांनंतर भावे नाटय़गृहाचा निरोप घेतला.
 ‘लोकसत्ता’च्या वतीने १५ एप्रिलपासून दहावीनंतर काय? या शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात केली जात आहे. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना आता काय करायचे, कोणती शाखा निवडायची, सायन्स की वाणिज्य? कला शाखेत करियरच्या किती संधी आहेत. आवडतेय ते शिकायचे म्हटले तर त्यात करियर घडेल का, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या डोक्यात पिंगा घालत असतात. विद्यार्थ्यांबरोबरच पालकही बुचकळ्यात पडलेले असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘लोकसत्ता’ने तज्ज्ञांच्या माध्यमातून देण्याचे ठरविले असून, या उपक्रमाचा शुभारंभ बुधवारी भावे नाटय़गृहात झाला. यावेळी ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर, इंडियन एक्स्प्रेस ग्रुपच्या वितरण विभागाचे उपमहाव्यवस्थापक अली अकबर रौनक, प्रसिद्ध व्यापारी नसीम सिद्दिकी, या उप्रकमाचे समन्वयक इक्बाल कवारे, यूएसआर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक ध्रुव उदाणी, संचालक सुलतान मालदार उपस्थित होते. उपक्रम शुभारंभ कार्यक्रमानंतर मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे, ग्रोथ सेंटरच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती साळुपखे, स्टील फ्रेम सिव्हिल इंडियाचे संचालक फारुक नाईकवाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दहावीतील विद्यार्थी आणि त्यांचे पालक एका तणावाखाली वर्षभर जगत असतात. काय करावे आणि काय करू नये, या गोंधळलेल्या अवस्थेत असणाऱ्या पालक-विद्यार्थी या वर्गाची जाणीव लोकसत्ताला असल्यानेच हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे लोकसत्ताचे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात ‘यशस्वी भव’च्या माध्यमातून लोकसत्ता हा विद्यार्थ्यांचा नेहमीच डोळस साथीदार राहिल्याचे कुबेर यांनी स्पष्ट केले. वेळ आणि ऊर्जा वाया जाईल म्हणून आमचेही फुटबॉल खेळणे दहावीला बंद करण्यात आल्याचे सांगून कुबेर पुढे म्हणाले, दहावीच्या विद्यार्थ्यांचे घर ओळखणे अतिशय सोपे आहे. ज्या घरात तणावग्रस्त वातावरण आहे ते घर दहावीच्या विद्यार्थ्यांचे आहे हे ओळखणे सोपे आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात लोकसत्ताने नेहमीच साथ दिली असून दहावीनंतर काय या उपक्रमाने विद्यार्थ्यांची भावी वाटचाल सोपी करण्याचा प्रयत्न केला आहे, असे कुबेर यांनी स्पष्ट केले.
शिक्षणाशिवाय दुसरी कम्युनिटी नाही, शिक्षणामुळेच आपल्या आयुष्यातील उंची गाठता येते. दहावीनंतर केवळ आठ वर्षांच्या शैक्षणिक मेहनतीनंतर ८० वर्षे सुखात जीवन जगता येत असल्याचे प्रसिद्ध व्यापारी नसीम सिद्दिकी यांनी सांगितले.

श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र महत्त्वाचा -राजेंद्र बर्वे
बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्त्व आणि जगण्याची कला या तीनही गोष्टींचा विचार केला की करियर घडवता येते. माणसे यशस्वी का होतात हे पाहण्यासाठी ५० वर्षांपूर्वी काही मुलांवर करोडो रुपये खर्च करून प्रयोग केला गेला, त्यात श्रद्धा आणि सबुरी ज्या मुलांमध्ये आहे ते यशस्वी झाल्याचे आढळून आले. आपल्याकडे हा मूलमंत्र त्यापूर्वी साईबाबांनी दिला आहे, पण तो आपण केवळ रिक्षाच्या पाठीमागे लिहण्यापुरताच आचरणात आणतो, प्रत्यक्षात तो मनात रुजवण्याची गरज असल्याचे मत प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी व्यक्त केले.करियर निवडताना एक साधी सोपी युक्ती बर्वे यांनी आपल्या भाषणात सांगितली. विद्यार्थ्यांनी घरी जाऊन आपल्या पालकांच्या समोर डाव्या व उजव्या हाताने सही करावी नेहमी उजव्या हाताने लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांची सही चांगली येईल पण डाव्या हाताची सही ही वेडीवाकडी येईल. उजव्या हाताची सही म्हणजे तुम्ही निवडलेले करियर असेल तर डाव्या हाताची सही म्हणजे तुमच्यावर जबरदस्तीने लादलेले करियर असेल, त्यामुळे ते न स्वीकारता ठणकावून त्याला विरोध करा आणि तुम्हाला आवडेल त्यात करियर करा असा सल्ला बर्वे यांनी दिला. महाविद्यालयात शिकविले जातात ते कोर्सेस आहेत ते करियर नाही असे स्पष्ट करून डॉ. बर्वे यांनी इग्लंडमध्ये मासे पकडणाऱ्या माणसांची गोष्ट सांगितली. ज्या ठिकाणी सर्व जण करियर करतात तेथे संधी कमी असते, पण ज्या ठिकाणी कमी लोकं जातात तेथे संधी जास्त खुणावत असल्याचे त्यांनी सांगितले. उंदराच्या शर्यतीत न धावता वाघाच्या शर्यतीत धावण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. भाषाज्ञान असणाऱ्या विद्यार्थ्यांला कलाज्ञान असेलच असे नाही, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

मानसिकता बदलावी – स्वाती साळुंखे
दहावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी ९० टक्के मार्के आणले म्हणजे तो सायन्सचा विद्यार्थी, ७० टक्केपर्यंत मार्क्‍स पडले म्हणजे तो कॉमर्सचा विद्यार्थी आणि त्यापेक्षा कमी म्हणजे त्याने कला विभागाता प्रवेश घ्यावा ही अनेक वर्षे झालेली पालकांची मानसिकता योग्य नसल्याचे मत ग्रोथ सेंटरच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती साळुखे यांनी व्यक्त केले. दहावी-बारावीनंतर शिक्षणाचे अनेक पर्याय खुले असून ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव शिक्षण अर्धवट सोडावे लागले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी उपलब्ध असल्याचे सांगून साळुखे यांनी मर्चट नेव्हीमध्ये उपलब्ध असणाऱ्या संधीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. आता काळ बदलला असून अनेक शैक्षणिक उप्रकमांचे स्वरूपदेखील बदलले आहे. काही शिक्षणक्रमांना वेगवेगळ्या विद्यापीठात वेगळी नावे दिलेली असतात, पण त्याचे स्वरूप सारखेच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वैद्यकीय शिक्षणामुळे डॉक्टर न होणारी विद्यार्थी रुग्णालयाशी निगडित अनेक कोर्स करू शकतात असे त्यांनी सांगितले. आर्ट्स करून सैन्यदलात जाणारे अनेक विद्यार्थी आहेत. त्यामुळे तो सोपा विषय नाही कठीण आहे, कारण प्रतिस्पध्र्याशी लढतानाही तुम्हाला इतिहासाची माहिती असणे आवश्यक असते. शिक्षणाची आवड लक्षात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा, सर्टिफिकेट आणि फाऊंडेशन कोर्सेस तयार करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

दहावीत चार वेळा नापास झालेल्या विद्यार्थ्यांलाही  आयएएस होता येते – फारुक नाईकवाडे
दहावी-बारावीत चार वेळा नापास झालेले विद्यार्थ्यांनीही आयएएस, आयपीएस स्पर्धा परीक्षा उर्तीण केल्या असल्याची माहिती स्टील फ्रेम सिव्हिल इंडियाचे संचालक फारुक नाईकवाडे यांनी या शिबिरात दिली. या परीक्षा उत्र्तीण होण्यासाठी कमीत कमी पदवीधर होणे आवश्यक असून, चिकाटी नियोजन आणि मेहनत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटात पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिका बघून आपण तसेच व्हायची स्वप्न पाहणारे विद्यार्थी खूप आहेत, पण त्यासाठी लागणारी मेहनत करणारे विद्यार्थी राज्यात कमी आहेत. त्यामुळेच बिहार, यूपी, आणि उत्तरांचलचे सनदी अधिकारी जास्त आहेत. कारण त्यांच्यात एक जिद्द दिसून येते. दहावी झाल्यानंतर लगचेच ते पीएम बनण्याची स्वप्ने पाहातात. त्यानंतर सीएम आणि ते झाले नाही तर डीएम होण्याची स्पप्ने ते पूर्ण करतात. दिवसाच्या नियोजनात जो नापास झाला तो आठवडय़ाच्या नियोजनात नापास झाला असे समजा आणि आठवडय़ाच्या नियोजनात नापास झाला तो महिन्याच्या आणि नंतर वर्षांच्या परीक्षेत नापास झाला असे समजायला हरकत नाही, त्यामुळे नियोजन महत्त्वाचे आहे. स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनाची अंत्यत गरज असल्याचे नाईकवाडे यांनी स्पष्ट केले. यावेळी विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांना अनेक प्रश्न विचारले. त्याची त्यांनी सर्मपक उत्तरे दिली. एका विद्यार्थ्यांने बर्वे यांना पैसा हेच सर्वस्व असल्याचे दिसून येते त्यावर आपले मत काय, असे विचारले होते. पैशाच्या मागे लागू नका, पैशाच्या मागे लागल्यानंतर आपले कोणी राहात नाही असे बर्वे यांनी सांगितले. टीचर होण्यासाठी काय करावे लागले, असे एका विद्यार्थिनीने साळुखे यांना विचारले, असे प्रश्न फार कमी विद्यार्थी विचारतात, असे साळुखे यांनी स्पष्ट केले. यावेळी उत्कृष्ट सूत्रसंचालनामुळे सूत्रसंचालिका सबा कवारे यांचा नाईकवाडे यांनी सन्मान केला.