व्हॉट्सअ‍ॅप या लोकप्रिय संदेशवहन अ‍ॅपची आता लवकरच वेब आवृत्ती येणार आहे. आता संगणकावरूनही आपण आपल्या व्हॉट्सअ‍ॅप मित्रांशी गप्पा मारू शकणार आहोत.
व्हॉट्सअ‍ॅप ही कंपनी आपल्या स्पर्धक अ‍ॅप्सना स्पर्धा देण्यासाठी लवकरच अ‍ॅपची वेब आवृत्ती बाजारात आणण्याच्या विचारात आहे. या संदर्भात कामही त्यांनी सुरू केले आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या अद्ययावत व्हर्जनमध्ये वापरण्यात आलेले कोड्स हे वेब आवृत्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोड्सशी साधम्र्य साधणारे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यावरून व्हॉट्सअ‍ॅप वेब आवृत्तीच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात फेसबुकने किंवा व्हॉट्सअ‍ॅपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी. हे अ‍ॅप लवकरच संगणकावर येण्याची चर्चा रंगली आहे. काही महिन्यांपूर्वी वेब आवृत्ती काढण्याची इच्छा व्हॉट्सअ‍ॅपतर्फे व्यक्त करण्यात आली होती. यामुळे आता हे काम अंतिम टप्प्यात आले असून व्हॉट्सअ‍ॅपचे अद्ययावत व्हर्जन ‘२.११.४७१’ हे वेबआधारित असेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामध्ये वापरकर्त्यांला लॉग-इन आणि लॉग-आऊटचा पर्याय देण्यात आला असून दूरध्वनी क्रमांकाच्या सहाय्यानेच संगणकावरही हे अ‍ॅप वापरता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे प्रतिस्पर्धी वायबर, वूईचॅट, टेलिग्राम आणि लाइन यांनी यापूर्वीच आपले वेबआधारित अ‍ॅप बाजारात आणले आहेत. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप यामध्ये काही मोठी क्रांती करीत आहे, असे नसले तरी इतर अ‍ॅप्सच्या तुलनेत या अ‍ॅपचे वापरकर्ते जास्त असल्यामुळे त्यांच्या नवीन वेबआधारित अ‍ॅपचा करोडो वापरकर्त्यांना फायदा घेता येणार आहे.