सिंचन घोटाळ्यासंदर्भात राज्य शासनाने सादर केलेली श्वेतपत्रिका ही जनतेची फसवणूक करणारी असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. वन्यजीव शिकार प्रकरणी राज्यमंत्री फौजिया खान यांच्यावर गुन्हा दाखल करावा व त्यांची चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली.
सिंचनाच्या घोटाळ्याबाबत शासनाने मांडलेली श्वेतपत्रिका दिशाभूल व फसवणूक करणारी आहे. महसूल, कृषी आणि जलसंपदा विभाग यांचे सिंचनासंबंधीचे अहवाल वेगवेगळे असून श्वेतपत्रिकेच्या माध्यमातूनही चुकीची माहिती देण्यात आली आहे. या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. शालेय शिक्षण आणि राजशिष्टाचारमंत्री फौजिया खान यांनी द. आफ्रिकेत केलेली शिकार व त्याची प्रसिद्ध झालेली छायाचित्रे या दोन्ही गोष्टी अशोभनीय आहेत. शिकार करणे आणि शिकारीची छायाचित्रे प्रकाशित करणे या गोष्टी शिकारीला प्रोत्साहन देणाऱ्या आहेत. राजशिष्टाचार सांभाळणाऱ्या मंत्र्याने सामाजिक बंधनांचे उल्लंघन करणे योग्य नाही. खान यांच्या परभणी येथील निवासस्थानातही वन्यप्राण्यांची कातडी तसेच िशगे वगैरे साहित्य आहे. या गोष्टी त्यांनी कोठून आणल्या याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली.
आंबेडकरी चळवळीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अफझल गुरूला फाशी देऊ नये असे वक्तव्य मुंबईत केले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की, दहशतवाद्यांवर वचक बसण्यासाठी अफझल गुरूला फाशी देण्याची गरज आहे. अशा पद्धतीने गुन्हेगारांपुढे शरणागती पत्करली तर सुरक्षेचाच प्रश्न निर्माण होईल. या प्रकरणी कोणीही राजकारण करता कामा नये.