शहरात गुन्हेगारांची हिंमत वाढली असून दुचाकीवर जाणाऱ्या महिलांचे पदर खेचून गळ्यातील मंगळसूत्र खेचण्यापर्यंत त्यांची मजल गेली असली तरी असे गुन्हे करणाऱ्या साखळी चोरांच्या अटकेची संख्या नगण्य आहे.
बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास एक अठरा वर्षांची मुलगी सायकलने घरी जात होती. शांतीनगरमधील रतन टॉवरसमोरून जात असताना आरोपी बादल सुधाकर बरमकर (रा. इतवारी रेल्वे स्थानकासमोर) याने तिला थांबविले. ‘मला काल शिव्या का दिल्या’ असे म्हणत तिचा हात धरून मारहाण केली. त्या मुलीच्या तक्रारीनंतर लकडगंज पोलिसांनी तातडीने धाव घेऊन त्याला गजाआड केले. दुसरीघटना धरमपेठेतील खरे टाऊनमध्ये बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. नूतन अविनाश शेगावकर,(रा. नागपूर) या कायनेटीक होंडाने मुलगा मयुरसह त्यांच्या दिराकडे जात होत्या. मागून आलेल्या मोटारसायकलवरील लुटारूंनी त्यांच्या साडीचा पदर ओढून गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्र खेचले आणि पळून गेले. साडीच्या पदराला पीनने खोचले असल्याने मंगळसुत्राचा अर्धाच भाग (दीड तोळा, किं. ४० हजार रुपये) लुटारूंच्या हाती लागला. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.  
चेन स्नॅचिंगच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असून असे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांच्या अटकेचे प्रमाण त्या तुलनेत नगण्य आहे. चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांनी पोलिसही त्रस्त आहेत. सोन्याचे दागिने घालून जाऊ नका, पदराने धाकून घ्या असे आवाहन पोलीस नेहमीच करीत असतात. मात्र, आता थेट पदर ओढून सोनसाखळी खेचणे गुन्हेगारांनी सुरू केल्याने, महिलांनी करावे तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.