चुकीच्या उपचारामुळे रुग्णाला ५ लाखांचा भरुदड
 येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील करार तत्त्वावरील शल्यचिकित्सक डॉ. रामदास भोंडे यांनी आपल्या मुलावर चुकीचा उपचार करून शस्त्रक्रियेसाठी चाळीस हजार रुपये उकळले. चुकीच्या उपचारामुळे मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या मुलाला वाचविण्यासाठी खाजगी रुग्णालयात पाच लाखाचा खर्च करावा लागला. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून डॉ. भोंडे यांना रुणालयातून बडतर्फ करावे, तसेच त्यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या तालुक्यातील साखळी बु. येथील कौसल्याबाई भीमराव सुते यांनी एका तक्रारीद्वारे जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे.
त्यांच्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा गणेश भीमराव सुते याला गावात झालेल्या मारहाणीत पोटात चाकू लागला होता. त्याला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील करार तत्त्वारील शल्यचिकित्सक डॉ. रामदास भोंडे यांनी त्यांच्या मुलाच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यासाठी नियमबाह्य़रित्या ५० हजार रुपयांची मागणी केली. गरजेपोटी त्यांना ४० हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर डॉ. भोंडे यांनी शस्त्रक्रिया केली. मात्र, यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी तो गंभीर झाला. तो मृत्यूशी झुंज देत असल्याने त्याला औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील तज्ज्ञ डॉक्टरांनी पूर्वीची शस्त्रक्रिया चुकीची असल्याचे सांगून त्याच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया केली. त्यानंतरच त्याचे प्राण वाचू शक ले. चुकीच्या उपचारामुळे आपल्या कुटुंबीयांना प्रचंड आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. औरंगाबादच्या खाजगी रुग्णालयात परिस्थिती हलाखीची असतांना पाच लाख रुपये उपचारासाठी खर्च करावा लागला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, चुकीचे उपचार करून आर्थिक लाचखोरी करणाऱ्या डॉ. भोंडे यांना रुग्णालयातील करार पदावरून त्वरित बडतर्फ करण्यात यावे, त्यांच्यावर निष्काळजीपणे व चुकीचे उपचार केल्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, घेतलेली लाच परत करावी, अशा मागण्या कौसल्याबाई भीमराव सुते यानी केल्या आहेत. त्यांनी आपले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनाही दिले आहे.  
यासंदर्भात डॉ. भोंडे यांनी रुग्णावर योग्य उपचार केल्याचे सांगून आरोप निराधार असल्याचे सांगितले. डॉ.भोंडे यांच्या विरोधात रुग्णांच्या दररोज बऱ्याच तक्रारी येत असून त्यांच्या एकूणच मनमानी कार्यपध्दतीमुळे रुग्णासह तेथील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारीही त्रस्त झाले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोंडे यांना अभय देत असून त्यामुळे रुग्णांचे मात्र हाल होत आहेत. येथे पूर्णवेळ व पगारी निष्णात शल्यचिकित्सक द्यावेत, अशी मागणी आहे.