पंजाबमधील होशियारपूर येथे अलीकडेच झालेल्या ३७व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत अंबरनाथ येथील श्रद्धा चोंधे या विद्यार्थिनीने सुवर्णपदक मिळवण्याची किमया साधली होती. आता ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पॅरिस येथे होणाऱ्या योगासनांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तिचे वडिल मंगेश रिक्षाचालक आहेत, तर आई गृहिणी. त्यामुळे पॅरिस येथे जाण्या-येण्यासाठी येणारा किमान दोन लाखांचा खर्च त्यांना न परवडणारा आहे. या पाश्र्वभूमीवर श्रद्धाला परदेशवारीसाठी आर्थिक मदतीची गरज आहे. अंबरनाथमधील योगवर्धिनी मिशन योग या संस्थेत श्रद्धा योगासनाचे प्रशिक्षण घेते. या संस्थेतील प्रशिक्षक राजेश पवार सध्या तिच्या परदेशवारीसाठी इच्छुकांकडून मदत मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.   श्रद्धा सध्या डोंबिवलीतील पेंढरकर महाविद्यालयात अकरावीत शिकत आहे.