सुट्टीच्या काळात नागरिक घरे बंद करून गावी जातात. या काळात घरे फोडून चोऱ्या करण्याचे प्रकार वाढतात. हे प्रकार टाळण्यासाठी डोंबिवली पश्चिमेत विष्णुनगर पोलीस ठाणे व दक्ष नागरिक संघातर्फे ईगल ब्रिगेड स्थापन करण्यात आली आहे. या ब्रिगेडच्या माध्यमातून ६० तरुण डोंबिवली पश्चिमेत विविध भागात रात्रीची गस्त घालत आहेत.
पोलीस उपायुक्त संजय जाधव, साहाय्यक पोलीस आयुक्त राजन घुले, विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राणे, दक्ष नागरिक संघाचे विश्वनाथ बिवलकर यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून दक्ष नागरिक संघ पोलिसांच्या साहाय्याने हा उपक्रम राबवीत आहे. त्यामुळे पश्चिम भागात चोऱ्यांचे प्रमाण घटले आहे. नागरिकांना विश्वासात घेऊन हा उपक्रम राबविण्यात येतो. त्यामुळे नागरिकांचे सहकार्य ईगल ब्रिगेडला मिळते. साठ तरुणांचा एक गट हे काम करीत आहे.
या तरुणांना पोलिसांकडून ओळखपत्र देण्यात आली आहेत. शिट्टय़ा व हातात काठी या तरुणांकडे असते. रात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत हे तरुण नेमून दिलेल्या भागात गस्त घालतात. काही इमारतींच्या आवारात जातात. तेथील रखवालदार झोपला असेल तर त्याला उठवतात. शिट्टी वाजवून नागरिकांना जागृत राहण्याचे आवाहन करतात. एखादा संशयित व्यक्ती आढळल्यास त्याची चौकशी करतात. अशी या ब्रिगेडची कामाची पद्धत असल्याने पोलिसांचेही काम या उपक्रमामुळे हलके होत आहे, असे विश्वनाथ बिवलकर यांनी सांगितले.